प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खाते, जिल्हा आयुष अधिकाऱ्यांनी गुरुवारी बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील एका क्लिनिकवर छापा टाकला. कोणत्याही परवानगीशिवाय दवाखाना चालविण्यात येत होता. त्यामुळे या दवाखान्याला टाळे ठोकले आहेत.
बेनकनहळ्ळी येथील ओम साईराज क्लिनिकवर छापा टाकण्यात आला आहे. राजू एम. पाटील यांचा हा दवाखाना असून जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोनी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत सुनदोळी, मंजुनाथ बिसनळ्ळी आदींनी अचानक छापा टाकून तपासणी केली. दवाखाना चालविण्यासाठी व डॉक्टरी व्यवसाय करण्यासाठी आवश्यक कोणत्याही प्रकारचे परवाने नसल्याचे आढळून आल्याने दवाखान्याला टाळे ठोकून पुढील चौकशीसाठी संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.