मेंदू हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. आपल्या साऱ्या शरीराची हालचाल किंवा जिवंतपणाच त्याच्यावर अवलंबून आहे. मेंदूला जरा जरी जखम किंवा व्याधी झाली तर त्याचा साऱ्या शरीरावर परिणाम होतो. चक्कर येते किंवा कित्येकदा माणूस बेशुद्धावस्थेतही जातो. त्यामुळे मेंदूला जपणे आवश्यक ठरते.
तथापि, इंग्लंडमध्ये ब्रँडन स्ट्रोमबर्ग नामक एक व्यक्तीची कहाणी काही वेगळीच आहे. तो काही महिन्यांपूर्वी एका दुकानात जात असताना त्याला काईल स्टिफन्सन नामक व्यक्तीने त्याच्या डोक्यावर जबर ठोसा लगावला. त्यामुळे ब्रँडन खाली कोसळला. बेशुद्धावस्थेत त्याला रुग्णलयात नेण्यात आले. तो कोमात केला होता. त्याचे स्कॅनिंग केले असता असे दिसून आले की त्यांचा निम्मा मेंदू निकामी झाला आहे. त्याच्या जगण्याची आशा डॉक्टरांनी सोडलीच होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंदूचा फाटलेला आणि निकामी झालेला भाग काढला. तो शुद्धीवर येईल की नाही, याचीच डॉक्टरांना शंका वाटत होती.
तथापि, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचे प्रत्यंतर आले. तो केवळ शुद्धीवरच आला असे नव्हे, तर चांगला हसू-बोलूही लागला. मात्र तो अपंग झाला होता. पण पुढे त्याचे अपंगत्वही दूर झाले आणि तो काही साधनांच्या आधाराने आता चालण्याच्या स्थितीत आला आहे. मात्र. पुन्हा डोक्याला जखम झाली तर मात्र त्याला वाचविणे कठीण होईल, असा डॉक्टरांनी इशारा दिल्याने त्याला सतत डोक्याला जखम होऊ नये म्हणून जपावे लागते. घरातही त्याला हेल्मेट घालून वावरावे लागते. पण तो वाचला आणि सुस्थितीत आहे, हेच मोठे आश्चर्य आहे.