प्रतिनिधी/ नवारस्ता
राज्याचे नवनिर्वाचित राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे जिह्यात प्रथमच आगमन झाल्यानंतर जिह्यात त्यांचे जोरदार स्वागत झाले. पाटण विधानसभा मतदारसंघात दिवसभर फटाक्यांची आतिषबाजी, ठिकठिकाणी औक्षण आणि रांगोळी काढून स्वागत झाल्याने खऱया अर्थाने बुधवारी मतदारसंघात दिवाळी साजरी झाली.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई यांचा अपेक्षेप्रमाणे अखेर राज्याच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यानंतर बुधवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्री देसाई यांचे सातारा जिह्यात प्रथमच आगमन झाले. संपूर्ण जिह्याने त्यांचे जोरदार स्वागत केले. साताऱयापासून उंब्रज आणि उंब्रज ते पाटण मार्गावरील चाफळपासून प्रत्येक गावात मंत्री देसाई यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. बेंजो, फटाक्यांची आतिषबाजी, रस्त्यावरील रांगोळी आणि अलोट गर्दी यामुळे पाटण मतदारसंघातील वातावरण वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुमदुमून गेले.
मंत्री देसाई यांचे बुधवारी सातारा जिह्यात आगमन झाले. सातारा शहरात तमाम शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनतेने त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर सातारा ते उंब्रज मार्गावर ठिकठिकाणी भव्य बॅनर, फटाक्यांची आतिषबाजी आणि संगीताच्या ठेक्यावर ‘आपला नेता झाला मंत्री’ अशा घोषणा देऊन नामदार देसाई यांचे स्वागत करण्यात आले.
मंत्र्यांना बसवले घोडय़ावर…
आपला नेता राज्याच्या मंत्रिमंडळात आता मंत्री बनल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यामुळे बुधवारी मंत्री देसाई यांचे सातारा-पाटण मार्गावर सजविलेल्या घोडय़ावर बसवून संगीताच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
पालकमंत्री पक्षश्रेष्ठी ठरवतील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जनतेला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे. राज्यात आपले आजोबा, राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यासारखे काम करणे कोणालाच जमणार नाही. मात्र त्यांच्या शिकवणीप्रमाणे सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करून लोकनेते बाळासाहेब देसाई तसेच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज पूर्ण करणार आहे. दरम्यान, सातारा जिह्याचा पालकमंत्री जिल्हय़ातील असावा, की बाहेरचा यावर पालकमंत्री पक्षश्रेष्ठी ठरवतील, असे स्पष्टीकरण मंत्री देसाईंनी नवारस्ता येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
मल्हारपेठ येथेही जोरदार स्वागत
मल्हारपेठ : राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा मल्हारपेठ येथे भव्य सत्कार समारंभ झाला. मंत्री देसाई यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. शिवदौलत बँकेतर्फे त्यांची वहीतुला करण्यात आली. त्यानंतर मल्हारपेठ विभागातर्फे व गावाच्या वतीने सत्कार झाला. देसाई गटाचे कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला मंडळ यांच्या वतीनेही सत्कार झाला. पाटण पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, शिवदौलत बँकेचे अध्यक्ष ऍड. मिलिंद पाटील, सर्व संचालक, मल्हारपेठचे माजी सरपंच आर. बी. पवार, सुनील पानस्कर, गणेश कदम, नानासो कुंभार, गौरीहर दशवंत, मानसिंग कदम, अभिजित पवार, सुनील पवार, अशोक स्वामी, जगन्नाथ पवार, कौस्तुभ सुतार, जयवंत पानस्कर, तेजश्री शेटे, रेखा भिसे, विजय यादव, बी. एल. पानस्कर, अशोक डिगे, शोभा जैन, सुरेखा स्वामी, सुशीला कुंभार, रोहिणी चव्हाण आदींच्या हस्तेही मंत्री शंभूराज यांचा भव्य सत्कार झाला. त्यानंतर त्यांनी शिवदौलत बँकेसही सदिच्छा भेट दिली.