ऑनलाईन विक्रीविरोधात आंदोलन
वार्ताहर/ निपाणी
ऑनलाईन मोबाईल विक्री करणाऱया कंपन्यांकडून ग्राहकांनी विविध सवलतीची आमिषे दाखवून किरकोळ विक्री करणारी दुकाने बंद पाडण्याचा घाट घातला आहे. याला शासनाचेही चुकीच्या धोरणातून अप्रत्यक्ष पाठबळ मिळत आहे. यामुळे विक्रेत्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा निषेध करण्यासाठी देशभरातील विक्रेत्यांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदला पाठिंबा म्हणून निपाणीतील मोबाईल दुकाने बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी ग्वाही निपाणी मोबाईल विक्रेते संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
मोबाईल विक्रेत्यांनी केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांकडून चुकीच्या पद्धतीने दिली जाणारी सवलत बंद करावी, ऑनलाईन कंपन्यांकडून एफडीआयचे उल्लंघन होत आहे. त्याची चौकशी करावी, कॅशऑन डिलेव्हरी पद्धत बंद करावी, विक्रेत्यांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज सुलभरित्या कोणत्याही जामिनाविना द्यावे, काही कंपन्या ऑनलाईन विक्रीसाठीच उत्पादने देतात ती थांबवून सर्वांना उपलब्ध करावेत, ऑनलाईन व ऑफलाईनमध्ये असणारा किंमतीतील फरक बंद करावा, अशा मागण्या केल्या आहेत.
बुधवारी संपूर्ण देशातील मोबाईल दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी दिल्ली येथील रामलिला मैदानावर निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून निपाणीतील मोबाईल दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. ग्राहकांनी होणारी गैरसोय समजून घ्यावी. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सुंदर साळुंखे, इम्रान मकानदार, विजय जसवाल, राजू मुल्ला, संजय जसवाल, आकाश पाटील, कुनाल नरके, दीपक खाडे, रोहन शाह, गणेश देशपांडे आदी विक्रेत्यांनी केले आहे.