लिंकल्न (न्यूझीलंड) / वृत्तसंस्था
बहरातील पृथ्वी शॉने 35 चेंडूत 48 धावांची जलद खेळी साकारल्यानंतर भारत अ संघाने पहिल्या अनधिकृत वनडे सामन्यात न्यूझीलंड अ संघाचा 5 गडी राखून धुव्वा उडवला. विजयासाठी 231 धावांचे आव्हान भारताने 20 पेक्षा अधिक षटकांचा खेळ बाकी राखत पार केले.
भारतीय टी-20 संघात धवनऐवजी संधी मिळालेल्या यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने 21 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले तर सुर्यकुमार यादवने 19 चेंडूतच 35 धावा झोडपल्या. गोलंदाजीच्या आघाडीवर भारत अ संघातर्फे मोहम्मद सिराज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 6.3 षटकात 33 धावात 3 बळी घेतले. याशिवाय, खलील अहमद, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यामुळे भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघाचा डाव 9 चेंडू बाकी असतानाच 230 धावांवर संपुष्टात आणला.
यजमान संघातर्फे रचिन रविंद्राने 58 चेंडूत 49 धावा झोडपल्या तर कर्णधार टॉम ब्रुसने 55 चेंडूत 47 धावांचे योगदान दिले. भारत अ संघाने प्रत्युत्तरात शॉ व मयांक यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे जोरदार सुरुवात केली. या जोडीने 9.1 षटकातच 91 धावा झोडपल्या होत्या. 20 वर्षीय पृथ्वी शॉने चौफेर फटकेबाजी केली.
कर्णधार शुभमन गिलने 30 धावा जमवल्या तर सुर्यकुमार यादवनेही फटकेबाजीवर भर दिला. विजय शंकर (20) व कृणाल पंडय़ा (13) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले व 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत अ संघाने आघाडी घेतली. उभय संघातील दुसरी व तिसरी अनधिकृत वनडे ख्राईस्टचर्च येथे अनुक्रमे शुक्रवार व रविवारी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड अ : 48.3 षटकात सर्वबाद 230 (रचित रविंद्रा 58 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 49, टॉम ब्रुस 55 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 47, कोल मॅकोन्शी नाबाद 34. अवांतर 9. मोहम्मद सिराज 3-33, खलील अहमद, अक्षर पटेल प्रत्येकी 2 बळी, विजय शंकर, राहुल चहर प्रत्येकी 1 बळी).
भारत अ : 29.3 षटकात 5 बाद 231 (पृथ्वी शॉ 35 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह 48, संजू सॅमसन 21 चेंडूत 39, सुर्यकुमार यादव 19 चेंडूत 35, शुभमन गिल 30, मयांक अगरवाल 29. अवांतर 15. जेम्स नीशम 2-25, अक्षर पटेल, टॉड ऍस्ले, रचित रविंद्रा प्रत्येकी 1 बळी).