15 दिवसांपुर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज
प्रतिनिधी/ दापोली
दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी बुधवारी सकाळी तब्बल 57 फूटी मृत व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. बऱयाच दिवसांपुर्वी त्याचा मृत्यू झाल्याने दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी त्याला तत्काळ त्याच ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने वाळूत मोठा खड्डा करून पुरण्यात आले. त्याचा अकाली मृत्यू झाल्याचा निष्कर्ष प्राणीमित्रांकडून काढण्यात येत आहे.
मुरूड येथील लाईफ गार्डचे काम करणारे राजेश शिगवण नेहमीप्रमाणे किनाऱयावर पाहणी करत असताना त्यांना महाकाय मृत व्हेल आढळून आला. त्यांनी मुरूड सरपंच व हॉटेल व्यावसायिक सुरेश तुपे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तुपे यांनी पोलीस व वनविभागाला खबर दिली. परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे, वनपाल गणेश खेडेकर, वनरक्षक महादेव पाटील, सुरेशा जगदाळे तसेच कांदळवण कक्षाचे अभिनय केळसकर व मोहन उपाध्ये आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
समुद्रकिनारी सुटलेल्या दुर्गंधीवरून हा मासा सुमारे 15 दिवसांपुर्वीच मृत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्याच्या शरीराचे लहान लहान तुकडे पाण्याबरोबर वहात किनाऱयाला आले होते. यातून व्यक्तीला जंतूसंसर्ग होवू शकतो अशी माहिती कांदळवन मित्र अभिनय केळसकर यांनी दिली. मृत मासा हा ब्लू व्हेल जातीचा असल्याचा अंदाजा व्यक्त होत असून त्याच्या शरीराच्या काही भागांचे नमुने तपसणीसाठी मुंबई येथे पाठवण्यात आले आहेत. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर या माशाचा प्रवर्ग, वय आदींची माहिती मिळू शकेल असे त्यांनी सांगितले.
सहा वर्षांत सापडले दोन व्हेल
मुरूड किनारी बुधवारी ज्या ठिकाणी महाकाय व्हेल सापडला त्याच्यापासून काही अंतरावरच 16 सप्टेंबर 2016 रोजी असाच एक व्हेल मृतावस्थेत सापडला होता. तसेच 2014 मध्ये लाडघर किनाऱयावरही महाकाय मृत व्हेल आढळला होता. तो मासा प्रचंड असल्याने त्याचे तुकडे करून दफन करण्यात आले होते. सुमारे 18 वर्षांपूर्वी केळशी खाडीच्या पलीकडेही भलामोठा व्हेल मृतावस्थेत आढळून आला होता.
व्हेलच्या हाडांचे जतन करणार
मुरूड समुद्र किनारी बुधवारी सापडलेल्या व्हेलचे दफन करण्यापुर्वी त्याची लांबी, रूंदी मोजण्यात आली. या व्हेलचा सांगाडा जतन करण्याच्या सूचना मुंबई कांदळवण विभागाकडून देण्यात आल्या. मात्र तुर्तास ते शक्य नसल्याने दोन जेसीबीच्या मदतीने मोठा खड्डा करून त्याचे दफन करण्यात आले. काही कालावधीने तो खड्डा पुन्हा उकरून सांगाडा मुंबईत जतन केला जाणार असल्याचे अभिनय केळसकर यांनी सांगितले.
अकाली मृत्यू झाल्याचा संशय
व्हेल मासा दिर्घायुषी म्हणून ओळखला जातो. सुमारे 100 वर्षांचे आयुष्य व 100 फुटापर्यंत लांब तो वाढू शकतो. मुरूड येथे सापडलेला व्हेल 57 फुटांचा असल्याने तो सुमारे 20 वर्षांचा असावा असा अंदाज आहे. खोल समुद्रात जहाजाच्या धडकेने अथवा समुद्री प्रदुषणाने त्याचा मृत्य झाला असवा अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्याचबरोबर व्हेल कुटुंब प्रिय असल्याने कुटुंबापासून दुरावल्यास तो मनुष्याप्रमाणे आत्महत्या देखील करतात अशी माहिती अभिनय केळसकर यांनी दिली. त्यामुळे या व्हेलचा अकाली मृत्यू झाल्याचेचे पुढे येत आहे.
व्हेल जगातील सर्वात मोठा प्राणी
जगातील सर्वात मोठा प्राणी म्हणून ख्याती असणारा व्हेल प्रामुख्याने मांसाहारी असतो. मासे, ऑक्टोपस, शेल मासे, छोटे शार्क, समुद्र कासवे हे त्यांचे अन्न आहे. त्यांची भूक अफाट असते. त्याच्या सुमारे 440 जाती आहेत. सर्व जाती दिसण्यास सारख्या असल्या तरी आकार व रंगांत विविधता आढळते. काहींच्या शरीरावर पट्टे, ठिपके किंवा नक्षी दिसते. त्यांचे यकृत मोठय़ा आकाराचे असून त्यात तेल साठवलेले असते. सरारसी आयुष्य 25 वर्षांचे असते, पण काही 100 वर्षेही जगतात. सुमारे 35 कोटी वर्षांपासून त्यांचे अस्तित्व आढळते. बहुतेक व्हेल साधारणपणे 4555 मी. खोलीवर आढळतात. भारताच्या सागरी परिसरात व्हेल शार्क, टायगर शार्क, व्हाइट शार्क, मुशी व हॅमर हेडेड शार्क आढळतात. भारतात ते कोठेवाड, मुंबई, केरळ व प. बंगाल लगतच्या सागरांत वर्षभर आढळतात. हे मासे जुलै ते मार्च या काळात पश्चिम किनाऱयांवर आणि मे ते जानेवारी या काळात पूर्व किनाऱयांवर मोठय़ा प्रमाणात आढळतात.