प्रतिनिधी/ मडगाव
सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्या खंडणीची मागणी करण्यामागे कॅनडातील ग्लोबल टी-20 क्रिकेटमधील गुंतवणूक कारणीभूत आहे का? याचा तपास करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. मंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी त्वरित कॅनडातील ग्लोबल टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. ग्लोबल टी-20 क्रिकेट स्पर्धेत बोली लावण्यासाठी त्यांच्या सोबत तत्कालीन प्रदेश भाजप अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तसेच गोवा क्रिकेट संघटनेचे माजी खजिनदार तथा उद्योजक विलास गांवस देसाई यांनी विदेशवारी केली होती व त्यांनी ‘एडमोंटन रॉयल्स’ संघाची मालकी घेतली होती. एडमोंटन रॉयल्स संघाची मालकी मिळविण्यासाठी त्यांनी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता.
भारतात जसे ‘आयपीएल’चे सामने होतात, त्याच धर्तीवर कॅनडात ग्लोबल टी-20 क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येते. ही स्पर्धा 25 जुलै ते 11 ऑगस्ट 2019 या दरम्यान खेळविण्यात खेळविण्यात आली होती. भारताच्या युवराज सिंह सह वेस्टइंडिजचा क्रिस गेल, न्युझिलंडचा कर्णधार केन विल्सम्सन, श्रीलंकेचा थिसारा परेरा, पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी सारखे दिग्गज खेळाडू या स्पर्धेतून खेळले होते.
आयपीएल प्रमाणेच एखाद्या संघाची मालकी मिळविण्यासाठी कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करावी लागते. संघांतून खेळणाऱया खेळाडूंसाठी कोटय़वधी रुपये मोजावे लागतात. गोव्यातील राजकारण्यांनी कॅनडात जाऊन क्रिकेट खेळावर मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केल्याने, तो गोव्याच्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता.
एडमोंटन रॉयल्स संघाचे कर्णधारपद न्युझिलंडचा कर्णधार केन विल्यम्सनकडे होते. दक्षिण आफ्रिकेचा फाफ डय़ु प्लेसिस हा अन्य एक प्रमुख खेळाडू या संघात होता.
आता मंत्री दीपक पाऊसकर यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याने, त्याचा कॅनडातील ग्लोबल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सहभाग हेही एक कारण असू शकते. क्रिकेट खेळात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली जात असल्याने अशा व्यक्ती नेहमीच चर्चेत असतात व त्यांना टार्गेट केले जाते. साहजिकच पाऊसकर यांचे कॅनडातील ग्लोबल टी-20 कनेक्शन आहे का? याचा तपास होणे आवश्यक आहे.