प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील खाणबंदीच्या विषयावर काल मुख्यमंत्र्यांनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. खाणी सुरू करण्याबाबत सरकार गंभीर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची सरकार वाट पाहत आहे. केंद्र सरकारही याबाबत आपले प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले तर 31 मार्च अगोदर राज्यातील खाण विषयावर तोडगा निघेल, असा आशावाद आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
खाण लीज नूतनीकरण प्रकरणी लोकायुक्तांनी केलेल्या सूचनांचा अहवाल आजच आपल्या कार्यालयात पोचला आहे. अद्याप आपण हा अहवाल पाहिलेला नाही. आपण हा अहवाल पाहणार व नंतर ऍडव्होकेट जनरलशी चर्चा करणार लोकायुक्तने सरकारला पाठविलेला हा अहवाल आहे. तो सरकारला बंधनकारक नाही. पण तरीही या अहवालाबाबत आपण ऍडव्होकेट जनरलचा सल्ला घेणार व नंतरच निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. मात्र सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
वित्त आयोगासोबत उद्या बैठक
15 वा वित्त आयोग आज 23 रोजी गोव्यात येत आहे. आयोगासोबत 24 रोजी आपली बैठक होणार आहे. आज विविध आयोग विरोधी पक्ष व अन्य आमदारांसोबत चर्चा करणार आहे तर उद्या 24 रोजी मंत्रिमंडळासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत गोव्यासाठी ज्या मागण्या करायच्या आहेत त्या मांडल्या जातील, असेही ते म्हणाले.
अधिवेशन, जि. पं. निवडणुकीबाबत चर्चा
आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीत अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभेचे कामकाज व त्याची तयारी त्याचबरोबर विषय कसे हाताळावे यावर चर्चा झाली. अर्थसंकल्पाची तयारी आपण सुरू केली आहे. त्यासाठी विविध महामंडळाचे प्रमुख, खात्यांचे प्रमुख यांना वेळ देऊन त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. जि. पं. निवडणुकीबाबत ही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थिती
दिल्लीत नुकत्याच झालेल्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीला आपण उपस्थिती लावली. केंद्र सरकारचे वेगवेगळे उपक्रम व ते कशा पद्धतीने राबवावे यासंदर्भात तिथे चर्चा झाली. राज्यात या योजना कशा पद्धतीने राबवाव्यात यावर चर्चा झाली. आज आमदार मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा विषय आपण त्यांच्यासमोर मांडून त्यांना माहिती दिली. वित्त मंत्र्यांसोबत आपली बैठक फलदायी ठरल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रकाश नाईक मृत्यूप्रकरणी पारदर्शक तपास होणार
प्रकाश नाईक मृत्यूप्रकरणी पारदर्शक पद्धतीने तपास केला जाणार आहे. कोणत्याही प्रकारे याबाबत तडजोड होणार नसल्याचे ते म्हणाले. तपासकार्य चालू करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्री माविन गुदिन्हो यांच्या भावाचे नाव येत असल्याबद्दल विचारले असता तपास योग्यपद्धतीने होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम पुढे जाणार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने पुढे जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. गाभा समिती व अन्य नेत्यांसोबत त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने पुढे जाणार असेही ते म्हणाले.