बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या नागरिकांना आता अजून 6 हून अधिक शहरांसाठी हवाई प्रवास करता येणार आहे. एप्रिल महिन्यापासून उडान 3 अंतर्गत या नव्या शहरांना जोडण्यात येणार आहे. यासाठी स्टार एअरने तयारी सुरू केली असून आणखी एक विमान आपल्या ताफ्यात घेतले आहे. त्यामुळे बेळगावकरांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.
स्टार एअरची सध्या बेळगाववरून चार शहरांना सेवा सुरू आहे. मुंबई, इंदूर, अहमदाबाद व बेंगळूर या चार शहरांना विमानाने जोडण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात नव्या मार्गांवर सेवा सुरू झाल्यास बेळगावमधून विमान उड्डाण करणारी ही सर्वांत मोठी कंपनी ठरणार आहे. यामुळे बेळगावच्या विकासाला चालना मिळणार असल्यामुळे नेमके कोणत्या शहरांना ही विमानसेवा सुरू होणार आहे, हे पहावे लागणार आहे.
जानेवारीपासून ट्रुजेटने हैदराबाद, तिरूपती व म्हैसूर शहरांना एकाचवेळी सेवा सुरू केली होती. स्पाईसजेट कंपनी हैदराबाद, बेंगळूर व मुंबई, एलायन्स एअर पुणे तर इंडिगो बेंगळूर व हैदराबाद या मार्गांवर सेवा देते. यापैकी दहा मार्गांना उडान 3 अंतर्गत मंजुरी मिळाल्याने अत्यंत कमी दरात विमान प्रवास करता येत आहे.
चौकट करणे.
ताफ्यात अजून दोन विमाने येणार
बेळगाव- जयपूर, बेळगाव-जोधपूर, बेळगाव-नागपूर, बेळगाव-नाशिक, बेळगाव-सुरत, बेळगाव-तिरूपती या मार्गांवर स्टार एअर उन्हाळी हंगामात सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. मार्च महिन्यापासून स्टार एअरच्या ताफ्यात अजून दोन विमाने येणार आहेत. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱया उन्हाळी हंगामापासून ही नवी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे स्टार एअरचे संचालक श्रीनिक घोडावत यांनी ट्वीट करून कळविले आहे.