ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम : महिला एकेरीच्या अंतिम लढतीत गॅर्बिन मुगुरुझावर सनसनाटी विजय
मेलबर्न / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या सोफिया केनिनने दोनवेळची चॅम्पियन गॅर्बिन मुगुरुझाचा सनसनाटी पराभव करत ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीचे जेतेपद संपादन केले. या विजयासह ती 12 वर्षातील सर्वात तरुण चॅम्पियन ठरली. शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत तिने मुगुरुझाला 4-6, 6-2, 6-2 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. 21 वर्षीय केनिनने आपल्या आक्रमणाला योग्य दिशा देत खेचून आणलेले जेतेपद अर्थातच विशेष लक्षवेधी ठरले. ही लढत 2 तास 3 मिनिटे चालली.
14 वी मानांकित केनिन आता नव्या मानांकन यादीत सातव्या स्थानी झेपावेल, हे या जेतेपदामुळे निश्चित झाले. जेतेपदावर शिक्कामोर्तब करताच केनिन आपले वडील अलेक्झांडर यांच्या दिशेने धावली. तिचे वडीलच तिचे प्रशिक्षकही आहेत.
या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल लागले असून सेरेना विल्यम्स तिसऱया फेरीत पराभूत झाली होती. त्यानंतर उपांत्य फेरीत केनिनने ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीचे आव्हान संपुष्टात आणले होते.
स्पेनची 26 वर्षीय मुगुरुझा 2014 नंतर एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी प्रथमच बिगरमानांकनासह उतरली होती. रॉड लेव्हर एरेनामध्ये पहिल्या सेटमधील तिसऱया गेममध्ये तिने सर्वप्रथम सर्व्हिस भेदली. यावेळी पावसाचा व्यत्यय आल्याने स्टेडियमचे छत बंद करण्यात आले.
मुगुरुझाच्या वाटचालीला ब्रेक
मॉस्कोचा जन्म असलेल्या केनिनने अंतिम फेरीच्या दिशेने आगेकूच करत असताना 15 वर्षीय कोको गॉफचे आव्हानही संपुष्टात आणले होते. मुगुरुझाला 2019 मधील शेवटच्या सहा महिन्यात केवळ एकच विजय संपादन करता आला होता. पण, इथे तिने दमदार आगेकूच साकारत अंतिम फेरीपर्यंत स्वप्नवत झेप घेतली होती. इथे मात्र तिला जेतेपदापासून दूर रहावे लागले.
येथील अंतिम लढतीत मुगुरुझा पहिल्या सेटमध्ये 3-1 फरकाने आघाडीवर होती व या आघाडीचे तिने 6-4 असे विजयात रुपांतर केले. पण, नंतरच्या दोन सेट्समध्ये तिच्याकडून बऱयाच चुका झाल्या आणि याचा केनिनने पुरेपूर लाभ घेण्यात किंचीतही कसर सोडली नाही. या लढतीदरम्यान उभयतात 23 फटक्यांची दीर्घ रॅली झाली, त्यात मुगुरुझा अपवादाने यशस्वी झाली होती.
दुसऱया सेटमध्ये केनिनची बाजी
केनिनने पहिला सेट गमवावा लागला, त्यावेळी संघर्ष साकारला होता. एकवेळ तर चार गेम पॉईंट वाचवत तिने 4-4 अशी बरोबरी साधली. मुगुरुझाकडून डबल फॉल्ट झाल्यानंतर याचा तिला लाभ मिळाला. अमेरिकेच्या केनिनचा फोरहँड फटका चुकल्यानंतर मुगुरुझाच्या पहिल्या सेटमधील विजयश्रीवर शिक्कामोर्तब झाले. हा सेट तिने 52 मिनिटात जिंकला. पण, नंतर केनिनने आक्रमक खेळ साकारत 4-1 अशी जोरदार आघाडी घेतली आणि 32 मिनिटातच सेटही जिंकला. मुगुरुझाला यादरम्यान पाठीच्या दुखण्यावर प्राथमिक उपचार करुन घ्यावे लागले. होते.
निर्णायक सेटमध्येही वर्चस्व
पुढे, निर्णायक सेटमध्ये केनिनने तीन गेमपॉईंट वाचवले आणि 4-2 अशी आघाडी घेतली. मुगुरुझाकडून नंतर डबल फॉल्ट झाले आणि केनिनने याचा लाभ घेत चॅम्पियनशिपवर थाटात शिक्कामोर्तब केले. 21 वर्षे 80 दिवस वय असताना ग्रँडस्लॅम जिंकणारी केनिन ही यापूर्वीची सर्वात तरुण चॅम्पियन जपानची नाओमी ओसाका हिच्यापेक्षा 22 दिवसांनी लहान आहे. मारिया शरापोव्हानंतर नाओमी हीच तरुण जेती होती. मारिया शरापोव्हाने 2008 मध्ये 20 व्या वर्षी ग्रँडस्लॅम जिंकत इतिहास रचला होता.