वृत्तसंस्था/ कोलकाता
भारताची महिला वेटलिफ्टर राखी हलदरने 72 व्या पुरुष व 35 व्या महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 64 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले.
ऑलिम्पिक पात्रतेसाठी 19 वे मानांकन असलेल्या राखीने स्नॅचमध्ये 93 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 117 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले. तिने एकूण 216 किलो वजन उचलले. मात्र तिला 218 किलोची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी तिला पार करता आली नाही. तिची जवळची प्रतिस्पर्धी चंदिगडच्या हरजिंदर कौलने 200 किलो वजन उचलत रौप्य मिळविले. मणिपूरच्या के. रोशिलता देवीने 187 किलो वजन उचलत कांस्य मिळविले. राखीने कतारमधील स्पर्धेत वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी नोंदवत कांस्यपदक मिळविले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये एकूण 214 किलो वजन उचलत सुवर्ण मिळविले होते.