ऑनलाईन टीम / पुणे :
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील ५१ महिला स्वच्छता कर्मचा-यांचा सन्मान सोहळा मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. पण ख-या अर्थाने समाजाची स्वच्छतेच्या माध्यमातून सेवा करणा-या महिला कर्मचा-यांच्या हस्ते दत्तमहाराजांची आरती करण्यात आली. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार बी.एम.गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त अॅड.एन.डी.पाटील आदी उपस्थित होते. महिला कर्मचा-यांना उपरणे, भेटवस्तू आणि दत्तमहाराजांची प्रतिमा देण्यात आली. सरस्वती शेंडगे म्हणाल्या, महिल्या ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाला आकार देतात. त्याप्रमाणे समाजाला आकार देण्याची क्षमता देखील त्यांच्यामध्ये आहे. आजमितीस राजकारणापासून ते सशस्त्र सेना दलामध्ये देखील महिला आहेत. त्यामुळे त्यांना आणखी प्रोत्साहन द्यायला हवे. विकसित देश म्हणून आपल्याला नावलौकिक मिळवायचा असेल, तर महिलांचा सन्मान राखणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. अॅड.शिवराज कदम जहागिरदार व शिरीष मोहिते यांनी मंदिराविषयी माहिती सांगितली.