वाहन विक्री डिलर्सच्या बैठकीत आरटीओ शिवानंद मगदूम यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीएस-4 वाहने 31 मार्चपर्यंतच नोंदणी करता येणार आहेत. त्यानंतर केवळ बीएस-6 वाहनेच नोंदणी होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी 31 मार्चपूर्वी वाहने नेंदणी करून घ्यावीत, तसेच डिलर्सनी 31 मार्चपूर्वीच बीएस-4 वाहने विक्री करावीत. त्यानंतर वाहने शिल्लक राहिल्यास ती नोंदणी करता येणार नाहीत, अशी माहिती बेळगावचे आरटीओ शिवानंद मगदूम यांनी दिली आहे.
बेळगाव आरटीओ कार्यालयाच्यावतीने बुधवारी बेळगावमधील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व सहा चाकी वाहने विक्री करणाऱया डिलर्सची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पेन, जेसीबी यासारखी बांधकाम निर्मितीसाठी वापरली जाणारी वाहने व शेती व्यवसायासाठी वापरले जाणारे टॅक्टर, पॉवर टेलर यासारख्या वाहनांना वगळून इतर वाहनांना हा नियम लागू असल्याचे त्यांनी सांगितले.
दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व सहा चाकी वाहनांची टेंपररी नोंदणीदेखील 31 मार्चपूर्वी करून घेणे गरजेचे आहे. बॉडीबिल्डींग करण्यासाठी गेलेल्या ट्रकना काही दिवस सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी 31 मार्चला एकाच वेळी गर्दी न करता टप्प्याटप्प्याने नोंदणी करून घ्यावी. डिलर्सनी आकर्षक ऑफर्स देऊन जुनी वाहने वेळेत विक्री करणे गरजेचे आहे. बीएस-6 वाहनांमुळे सल्फरच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी होणार असल्यामुळे त्याचा फायदा वाहनचालकांना होणार असल्याचे आरटीओ मगदूम यांनी सांगितले.
नेंदणीसाठी लागतोय वेळ
सध्या आरटीओ कार्यालयात नोंदणी करण्यासाठी आलेली वाहने वेटिंगवर आहेत. त्यामुळे वाहने जर लवकरात लवकर नोंदणी करायची असतील तर नोंदणीची गती वाढविण्याची मागणी डिलर्सनी केली. यावर बोलताना आरटीओंनी सर्व कर्मचाऱयांना लवकरात लवकर नोंदणीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.