संजीव खाडे / कोल्हापूर
कसबा बावडय़ातील वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारी स्पष्ट झाल्याने शहरासह जिल्हय़ात खळबळ उडाली आहे. या वृद्धेने रूग्णवाहिकेतून सातारा ते कोल्हापूर असा प्रवास करत अकरा दिवसांपूर्वी (28 मार्च रोजी) कसबा बावडा गाठला. यावेळी त्या रूग्णवाहिकेत चालक, त्याचा साथीदार होता, त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र याच रूग्णवाहिकेत त्यावेळी इतर दोन व्यक्तीही असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या अन्य दोन प्रवासी व्यक्ती कोण होत्या? या बद्दल गूढ कायम असून प्रशासनाला त्यांचा शोध घेण्याचे काम करावे लागणार आहे.
कोरोना पॉझिटिव्ह महिला 28 मार्चला रूग्णवाहिकेतून कोल्हापूरला आली. त्यानंतर 4 एप्रिला या त्रास होवू लागल्याने उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली. 28 मार्चला ती महिला साताऱयाहून रूग्णवाहिकेतून कोल्हापुरात आली. विशेष म्हणजे रूग्णवाहिका कोल्हापूरचीच आहे. रूग्णवाहिकेचा मालक चंबूखडी येथील आहे. चालक कळंबा येथील म्हाडा कॉलनीतील आहे. तर चालकाचा साथीदार रविवार पेठेतील आहे. रूग्णवाहिका घेवून चालक आणि त्याचा साथीदार पुण्याला एका रूग्णाला सोडण्यासाठी गेले होते. त्या रूग्णाला सोडून ते कोल्हापूरला येत असताना सातारा येथे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या रूग्णवाहिकेच्या आडवी एक इनोव्हा कार आली. कार आडावी आल्याने चालकानेरूग्णवाहिका थांबविली. इनोव्हातील व्यक्तींनी या मावशी (वृद्ध महिला) पोलीस अधिकाऱयाच्या नातेवाईक आहेत. त्यांना पेठ नाक्याजवळ सोडा, अशी विनंती रूग्णवाहिकेच्या चालकाला केली. त्यानंतर रूग्णवाहिका कोल्हापूरला जाणार असल्याचे समजल्यानंतर त्या व्यक्तींनी मावशींना कसबा बावडय़ात सोडा, अशी विनंती केली. महिला वयस्कर असल्याने रूग्णवाहिका चालकाने विनंती मान्य करत वृद्ध महिलेला कोल्हापूरला सोडण्याचे मान्य करत रूग्णवाहिकेत घेतले. त्याचवेळी अन्य दोन व्यक्ती तेथे आल्या. त्यातील एकाने आपल्याकडे पैसे नाही. कृपया मला उंब्रजजवळ सोडा अशी विनंती केली. तर दुसऱया व्यक्तींने मला कोल्हापुरातील सीपीआर रूग्णालयाजवळ सोडण्याची विनंती केली. रूग्णवाहिका चालकाने दोघांनाही रूग्णवाहिकेत घेतले. वृद्ध महिलेसह दोन पुरूष प्रवासी असे तिघे आणि चालक व त्याचा साथीदार असे पाच जण रूग्णवाहिकेतून कोल्हापूरकडे रवाना झाले. एक प्रवासी उंब्रज येथे उतरला. त्यानंतर कोल्हापुरात आल्यानंतर वृद्ध महिलेला कसबा बावडा येथे सोडल्यानंतर तिसऱया प्रवाशाला सीपीआर चौकात सोडून रूग्णवाहिका चालक आणि त्याचा साथीदार घरी गेले. 28 मार्चला हा सारा प्रकार घडल्यानंतर 4 एप्रिलला सदर वृद्ध महिलेला त्रास होवू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 6 एप्रिलला ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेवून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे.
रूग्णवाहिका चालक आणि त्याचा साथीदार ऍडमिट
दरम्यान, रूग्णवाहिका चालक आणि त्याच्या साथीदाराला कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेच्या संपर्कात आल्याने सीपीआरच्या कॉरंटाईन विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे आणि स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. दरम्यान, रूग्णवाहिका चालक आणि त्याच्या साथीदाराची प्रकृती चांगली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ऍडमिट करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हे दोघे त्यांच्या गल्लीतील, भागातील ज्यांच्या संपर्कात आले आहेत. त्यांचीही माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
रूग्णवाहिकेतील ते दोघे कोण?
रूग्णवाहिकेतून कोल्हापूरला आलेले उर्वरीत दोघे कोण आहेत? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. उंब्रजमध्ये उतरलेली आणि कोल्हापुरात सीपीआर चौकात उतलेली व्यक्ती कोण? त्यांचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनाला करावे लागणार आहे.