ऍथेन्स :
ग्रीसमध्ये सुरू असलेल्या ग्रीक चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना 23 मे रोजी आयोजित केला होता. पण कोरोना व्हायरस संकटामुळे हा अंतिम सामना लांबणीवर टाकण्यात येणार आहे. चालू महिन्याच्या अखेरीस या स्पर्धेतील उपांत्यफेरीचे सामने आयोजित केले आहेत. पण ग्रीस फुटबॉल संघटनेने हे सामने तूर्ताला तहकूब करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या पीएओके थेसालोनिकी या संघाने पहिल्या टप्प्याअखेर आघाडी मिळविली असून त्यांनी ऑलिम्पियाकोसवर पहिल्या टप्प्यातील सामन्यात 3-2 अशा फरकाने विजय मिळविला आहे. आता उभय संघातील परतीची लढत 23 एप्रिलला होणार आहे. एईए ऍथेन्स आणि ऍरिस थेसालोनिकी यांच्यातील पहिल्या टप्प्याअखेर ऍथेन्सने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे ग्रीसमध्ये सर्व क्रीडा स्पर्धा 27 एप्रिलपर्यंत तहकूब केल्या असल्याने आता 23 मे रोजी होणारा अंतिम सामना कदाचित लांबणीवर टाकावा लागणार आहे.