उपेंद्र बाजीकर / बेळगाव
‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ हा वाक्प्रचार रणांगणातील लढाईसाठी वापरला जातो. मात्र सध्या अवघे विश्व कोरोनाच्या धास्ती छायेत गुरफटले आहे. अशावेळी कोरोनाशी झुंज देणारे पोलीस, डॉक्टर, नर्सेस आणि पत्रकार हे कोरोनाच्या विरोधातील लढाईमध्ये योद्धे ठरले आहेत. भारताच्या कानाकोपऱयात अनेक योद्धे आपले कर्तव्य तर पार पाडतच आहेत. मात्र दूरदेशी थेट स्वित्झर्लंडमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सेवारत असणारी बेळगावची सुकन्या त्या देशामध्ये कोरोना योद्धा म्हणून गणली जात आहे. तमाम बेळगावकरांनी सलाम करावा असे या सुकन्येचे कर्तृत्व आहे. कुमुद शांताराम वेसणे असे त्या सुकन्येचे नाव आहे.
बेळगावातील जिल्हा कुस्तीगिर संघटनेचे सदस्य शांताराम वेसणे यांची कुमुद ही कन्या आहे. बेळगावच्या महिला विद्यालयातून माध्यमिक आणि आरपीडी महाविद्यालयातून कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून सन 1992 साली कुमुद स्वित्झर्लंड येथे रवाना झाली. तेथे गेल्यानंतर तिने नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केला. आज ती तेथील नामवंत हॉस्पिटलच्या नर्सिंग विभागामध्ये प्रमुख म्हणून कार्यरत आहे. तिच्या हाताखाली कोरोनाचे संरक्षक टीम कार्यरत आहे. कोरोनाच्या लढाईमध्ये भारतीयांनी अवलंबिलेली सूत्रे योग्य आहेत. मात्र त्यांचे पालन योग्यरितीने व्हावे, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.
यासंदर्भात कुमुद हिच्याशी व्हीडिओकॉलवरून संवाद साधला असता तिने आपल्या बेळगावकरांसाठी दक्षतेचा संदेश तर दिला आहेच. त्याचबरोबर परदेशामध्ये कोरोनाशी झुंज देण्याकरिता सुरू असलेल्या अथक प्रयत्नांची माहिती देखील दिली आहे. नेहमी भोगवादी जीवनशैली स्विकारणारे युरोप खंडातील अनेक देश कोरोनाच्या विकाराने हतबल झाले आहेत. अनेक अडचणींना सामोरे जात आणि निर्बंधांचे कठोर पालन करीत मुकाबला करण्याचे कार्य सुरू आहे. असे तिने सांगितले. स्वित्झर्लंडमधील सरकारने केलेल्या सूचनांचे तेथील रहिवासी कठोरपणे पालन करतात त्यामध्ये कोणालाही सवलत नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती तिने दिली.
कोरोना विषाणूने साऱया विश्वात प्रचंड धुमाकूळ घालून साऱयांची झोप उडविली आहे. स्वित्झर्लंड हा देशही याच्या कचाटय़ात सापडला असून, आतापर्यंत या विषाणुमुळे 850 लोकांचा बळी घेतला आहे. तर 22,500 जण याच्या संसर्गाने बाधित झाले आहेत.
एप्रिलपर्यंतच्या या संबंधातील आकडेवारीनुसार 22,646 लोक चाचणीत संसर्गित झाल्याचे व 859 जणांचा बळी गेल्याचे सत्य समोर आले आहे. ही गंभीर पार्श्वभूमी लक्षात घेऊन स्वीस सरकारने लॉकडाऊनचा कालावधी 26 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एप्रिल अखेरपर्यंत 16 मार्चपासून जारी करण्यात आलेल्या आणीबाणीत काहीशी शिथिलता देण्याचा सरकारचा मनोदय आहे. मात्र यासंबंधीचा निर्णय 16 एप्रिल रोजी संबंधित विभागातील अधिकाऱयांकडून आलेल्या अहवालावरून घेतला जाणार आहे.
3 एप्रिल रोजी स्वीस सरकारने कोरोना विषाणुंमुळे व्यवसाय ठप्प झालेल्या व्यावसायिकांना पुन्हा व्यवसाय उभे करण्यासाठी मदत म्हणून देण्यात येणारे कर्ज दुपटीने वाढविले. तशा आशयाचे तब्बल 76 हजार करार झाले आहेत असेही तिने सांगितले.
अत्यावश्यक सेवा देणारे व्यवसाय चालू
तेथील सरकारने सर्व जनतेला गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. घरीच राहा, असा सल्ला दिला आहे. तो खास करून आजारी व वृद्धांबाबत असून त्याचे काटेकोर पालन करा, असे सांगितले आहे. जमावबंदी लागू करण्यात आली आहे. देशातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाय योजले जात आहेत. बार, रेस्टॉरन्ट्स क्रीडा व सांस्कृतिक केंदे, सार्वजनिय कार्यक्रम यावर बंदी आहे. तर अत्यावश्यक सेवा देणारे व्यवसाय चालू ठेवण्यात आले आहेत. देशभरातील शाळा महाविद्यालये बंद आहेत असेही तिने सांगितले.
जगभरात कोरोनाशी झुंज देऊन रुग्णांना दिलासा देणाऱया सेवेकरी योद्धय़ांमध्ये बेळगावची कन्या परदेशात आपला लौकीक सार्थ ठरवते आहे. ही बाब बेळगावकरांसाठी निश्चितच अभिमानास्पद अशीच आहे.