‘लंडन’मधील गोवेकरांना कोरोनाची धास्ती लॉकडाऊन उशिरा झाल्याचा परिणाम
महेश कोनेकर / मडगाव
आजचा दिवस चांगला होता, उद्याचा दिवस कसा असेल याची चिंता सातत्याने भेडसावत असते. लंडन सारख्या प्रगत देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलाय. या ठिकाणी शनिवार दि. 11 एप्रिल पर्यंत 84,279 जण कोरोना बांधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 10,621 जणांचा बळी गेलाय. या ठिकाणी भारताप्रमाणेच लॉकडाऊन सुरवातीलाच हवा होता तसा तो झाला नाही. परिणामी कोरोनाचा फैलाव जोमाने होतोय व त्याची धास्ती येथे स्थायिक झालेल्या गोवेकरांनी घेतलीय.
माला वस्त व किरण धुरी हे गोमंतकीय दाम्पत्य लंडनमध्ये आपल्या मुलांसमवेत स्थायिक झालेले आहेत. लंडनमधील ‘गाय हॉस्पिटल’मध्ये माला क्लिनिकल सायंन्टिस्ट म्हणून कार्यरत आहे तर किरण हे ‘रेड बस’ या कंपनीत. सध्या लंडनमध्ये लॉकडाऊन असल्याने माला आपल्या घरातूनच हॉस्पिटलचे काम हाताळते तर किरण आपल्या कंपनीत जातो. त्यांची कियान व कुश ही दोन्ही मुले घरातच असतात.
कोरोनाबाधितांची संख्या वाढती
कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची अत्यंत गरज आहे. लंडनमध्ये लॉकडाऊन तसा उशिराच आत्मसात करण्यात आला, त्याचा परिणाम म्हणून कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंनदिवस वाढत आहे. आत्ता पर्यंत 10,621 लोकांचा बळी गेला आहे. ही आकडेवारी थरकाप उडवित असते. दररोज त्यात नव्याने भर पडत आहे. त्यामुळे उद्या काय होईल याची धास्ती या ठिकाणी सर्वांनीच घेतलीय.
भारताने लॉकडाऊनचा वेळीच सुरू केला, तशाच पद्धतीने लंडनमध्ये लॉकडाऊन झाला असता तर कोरोना बऱयापैकी नियंत्रणात राहिला असता अशी माहिती मालाने दिली. आज लॉकडाऊन सुरू आहे. त्यात सुपर मार्केटमध्ये वयस्क लोकांनी कधी यावे तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱयांनी कधी खरेदी करावी याचे वेळापत्रक ठरविण्यात आलेले आहे. त्या प्रमाणे लोक सुपर स्टोअर्समध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतात.
लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय क्षेत्र, पोलीस व प्रशासकीय यंत्रणा तसेच स्कूल कार्यरत आहेत व त्यांनाच आपली वाहने घेऊन फिरण्याची मोकळीक दिलेली आहे. इतरांना वाहने घेऊन बाहेर पडता येत नाही. अद्याप म्हणावी तशी शिस्त या ठिकाणी नाही. लोक समुद्रकिनाऱयांना भेट देत असतात अशी माहिती देखील मालाने दिली.
गेले तीन आठवडे माला आपल्या मुलांसह घरातच आहे. त्यात एका मुलाला मध्यतरी किंचित ताप आला. त्यानंतर त्यांना सात दिवस होम क्वॉरन्टाईन करण्यात आले तर किरणला 14 दिवस होम क्वारन्टाईन करण्यात आले. सध्या कोरोना व्हायरस जग पसरला आहे. त्यामुळे कुणाला दोष देणे योग्य ठरणार नाही. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणे हाच त्यावर उपाय असल्याचे मत मालाने व्यक्त केले आहे.
लंडनमध्ये डॉक्टर व परिचारीका यांचाही गेला बळी
कोरोना व्हायरस रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व परिचारीका यांचाही लंडनमध्ये बळी गेला आहे. त्याच बरोबर डॉक्टर, परिचारीका तसेच इतर वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना डय़ुटीवर घेऊन जाणाऱया ड्रायव्हरांचा देखील बळी गेलाय. त्यामुळे कुणीही आपण सुरक्षित आहोत असे म्हणणे चुकीचे ठरू शकते. ज्या गतीने तो फैलावतो, ते पाहता प्रत्येकाने आपली काळजी घेणे खुपच महत्वाचे आहे असे मत ही त्यांनी व्यक्त केले आहे.
टीव्ही पाहणेही बंद ..
जगभरात कोरोना व्हायरसचे वाढते रुग्ण व मयतांची संख्या वाढत असल्याच्या बातम्या टीव्हीवरून दाखविल्या जात आहे. या बातम्या ऐकल्या की मन अस्वस्थ होते. त्यामुळे टीव्ही पहाणेसुद्धा बंद करण्यात आल्याची माहिती मालाने दिली.