प्रतिनिधी / मडगांव
आलिशान आणि मनमोहक दागिने बनविण्याचे ना काम आणि त्यामुळे ना मजुरी आणि त्यात कोवीद-19मुळे गेल्या महिन्यापासून लादलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे सध्या हलाखीत दिवस काढणाऱया गोव्यातील 80 सुवर्ण कारागिरांना गोमंतक सुवर्ण कारागीर संघातर्फे प्रत्येकी 4 हजार रुपये वितरित करण्यात आले.
या मौलिक कार्यासाठी आर्थिक साहाय्याचा हात दिला त्या दैवज्ञ समाजातील काही दानशूर दात्यानी. दात्यांच्या या दानशूरतेमुळे सुमारे 80 सुवर्ण कारागिरांना आर्थिक मदत मिळू शकली.
गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रमित रायकर यांनी असोसिएशनच्यावतीने एक लाख रुपये तर उल्हास ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनाने एक लाख देऊन गोमंतक सुवर्ण कारागीर संघाने पुढाकार घेतलेल्या या मोहिमेला पाठबळ दिले. या दोन घटकांनी दिलेले हे साहाय्य पाहून त्यानंतर अनेक दानशूर व्यक्तींनी सहकार्याचा हात पुढे केला.
मदतीचा हात
अनेकांनी पाच ते 25 हजारपर्यंत आर्थिक साहाय्य गोमंतक सुवर्ण कारागीर संघाकडे दिले. पिवळय़ा धातुच्या अलंकारित आभूषणांनी समाजातील विविध घटकातील स्त्रियांच्या सौदर्यात भर घालण्यात मौलिक हातभार लावणाऱया सुवर्ण कारागिरांना या बिकटप्रसंगी या दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देऊ केला.
काही दिवसापूर्वी सुवर्ण कारागिरांवर आलेली हलखीची परिस्थिती पाहून या संघटनेने राज्य सरकारकडून आर्थिक साहाय्याची अपेक्षा केली होती. प्रशासनाकडे साकडे घातले होते. सरकारकडून या सुवर्ण कारागिरांना साहाय्य मिळेल ना मिळेल याबाबत शाश्वती नव्हती किंवा त्यासंबंधी आत्ताच काही सांगता येत नव्हते. मात्र, प्रसंगी धाऊन आले त्या वरील दानशूर व्यक्ती आणि वरील संघटना.
गोमंतक सुवर्ण कारागीर संघटनेने प्रारंभी एक सर्व्हेक्षण केले आणि त्यात हलाखीत दिवस काढणाऱया आणि आपली ही परिस्थिती सामाजिक प्रतिष्ठेपोटी लपवून ठेवणाऱया 80 सुवर्ण कारागिरांची निवड केली होती. त्यातील काहीजणांना सुवर्ण कारागीर संघाच्या मडगावच्या कार्यालयात आयोजित केलेल्या एका छोटय़ा कार्यक्रमात 4 हजार रुपयांची ही रक्कम वितरित करण्यात आली तर काहीजणांना त्यांच्या घरी जाऊन संघाच्या पदाधिकाऱयांनी सन्मानाने हे आर्थिक साहाय्य पोहोचते केले.
सरकारकडे साहाय्यासाठी निवेदन
गोव्यात हजारो कुटुंबे वर्षानुवर्षे सुवर्ण कारागिरीवर अवलंबून आहेत. या कारागीरांचे मालक थेट ग्राहक किंवा दुकानदार होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत ज्वेलरी दुकाने बंद आहेत तसेच ग्राहकही सुवर्ण कारागिरांकडे फिरकत नसल्यामुळे सुवर्ण कारागिरांचे सध्या हाल झालेले आहेत. संघाचे अध्यक्ष सुहास वेर्णेकर यांनी राज्य सरकारकडे साहाय्यासाठी निवेदन पाठविले होते. सुवर्ण कारागीर संघाच्या या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी विक्रम वेर्लेकर यांनी मौलिक हातभार लावला तर पवन रांगणेकर, सुशांत लोटलीकर, दीपक बांदोडकर, किशन लोटलीकर, प्रदीप कारेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप योगदान दिले.