वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलीयर्स यांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत 2016 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघातून खेळणारे कोहली आणि डिव्हिलीयर्स यांनी गुजराथ लायन्स विरूद्धच्या सामन्यात या स्पर्धेतील विक्रमी 229 धावांची भागिदारी केली होती. या सामन्यात वापरण्यात आलेल्या क्रिकेट साहित्याचा कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी लिलाव करण्याचे ठरविले आहे.
भारताप्रमाणे दक्षिण आफ्रिकेलाही कोरोनाचा फटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डिव्हिलीयर्सने या सामन्यात वापरलेल्या क्रिकेट साहित्यांचे आपली स्वाक्षरी केलेले छायाचित्र इंटरनेटवर प्रसिद्ध केल्याची माहिती सोमवारी सोशल मिडियाशी बोलताना सांगितले. आयपीएल स्पर्धेतील आजपर्यंतची ही ऐतिहासिक विक्रमी भागिदारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर नोंदविली गेली असून कोहली आणि डिव्हिलीयर्स या जोडीने 96 चेंडूत 229 धावांची भागिदारी केली होती. कोहली आणि डिव्हिलीयर्स यांनी आपली शतके झळकविली होती. आरसीबीने हा सामना 144 धावांनी जिंकला होता. क्रिकेटच्या माध्यमातून अशा बऱयाच अविस्मणीय घटना माझ्या आयुष्यात आल्याचे डिव्हिलीयर्सने म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे अनेक लोक बेघर झाले असून त्यांना जेवणही मिळणे अवघड झाले आहे. अशा गरजू व्यक्तींसाठी आम्ही या क्रिकेट साहित्यांच्या लिलावातून जमा होणारी रक्कम मदत म्हणून देणार असल्याचे कोहली आणि डिव्हिलीयर्स यांनी सांगितले.