इंदिरा मार्केट व पालिका गार्डनजवळही सेवा देणार
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा पालिकेतर्फे लॉकडाऊन काळात ग्राहकांची भाजी विक्रेत्यांकडे झुंबड होऊ नये यासाठी प्रायोगिक तत्वावर सामाजिक अंतर पाळत एअरपोर्ट रोडवर भाजी मार्केट व्यापाऱयांची व्यवस्था काल रविवारपासून करण्यात आली आहे. या खुल्या रस्त्यावर सद्य परिस्थितीत एकूण 31 व्यापाऱयांना सामावून घेतले असून येत्या काळात अधिक व्यापाऱयांचीही सोय करण्यात येणार आहे. फोंडा पालिकेच्या मासळी विक्रेत्यांनाही याच धर्तीवर अन्यत्र हलविण्यात येणार असल्याचे संकेत नगराध्यक्ष व्यंकटेश उर्फ दादा नाईक यांनी दिले.
बुधवारपेठ भाजी मार्केटच्या मागील बाजूला असलेल्या एअरपोर्ट रोडवर ही सोय करण्यात आली असून सामाजिक अंतर व येणाऱया प्रत्येक ग्राहकांसाठी सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे. येथे देखरेख ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस, पालिका कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पालिका कर्मचाऱयांतर्फे दर दोन तासांनी मार्केट परिसर सॅनिटायझेशनही निजर्तुंकीकरण करण्यात येणार आहे. बेळगांवमार्गे येणारी भाजी विक्रेत्याना अंतर ठेवून गावठी भाजी विक्रेत्यांना बसण्याची सोय करण्यात आलेली आहे. आठवडी बुधवार, शनिवार व रविवारी बाजारात येणाऱया व्यापाऱयांचीही सोय करण्यात येणार आहेत. पुरूमेताचा बाजार घेण्यासाठी ग्राहकांनी झुंबड करू नये. सोशल डिस्टन्सिंग पाळत खरेदी करावी असे आवाहन व्यंकटेश नाईक यांनी केले आहे. एअरपोर्ट रोडवर भरविण्यात आलेल्या बाजाराचा आढावा पालिका प्रशासन अधिकारी, पालिका मुख्याधिकारी तसेच आमदार श्री. नाईक यांनी घेतला.
व्यापारी भिका घाडी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, मागील महिनाभराच्या काळात व्यवसाय बंद असल्याने आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. सध्या तात्पुरती भाजी विक्रीची सोय पोलिकेतर्फे करण्यात आल्यामुळे दिलासा मिळालेला असून आज पालिकेतर्फे कोणतेही भाडेपट्टी शुल्क आकारण्यात आलेले नसल्याचेही सांगितले. शंकर नाईक यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले गर्दीच्या बाजारातून दूर एअरपोर्ट रोडवर भाजीविक्री हा पालिकेचा निर्णय योग्य आहे. मात्र जोपर्यंत शहरात रस्त्या-रस्त्यावर होणारी भाजीविक्री थांबत नाही तोपर्यत येथील विक्रेत्यांना गिऱहाईक मिळणार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पालिका प्रशासनाने सुचविलेल्या निर्णयानुसार पालिकाक्षेत्रात इतरत्र बाजार भरविण्यासाठी इंदिरा मार्केट व पालिका गार्डनजवळील खुल्या जागेचे पर्याय सुचविण्यात आले आहेत. येत्या दिवसात याठिकाणी मासळी विक्रेत्यांनाही विक्री करण्यासाठी मुभा देण्याचा पालिकेचा विचार असल्याचे नगराध्यक्ष श्री. नाईक यांनी सांगितले.