प्रतिनिधी/ खेड
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शहरात हापूस विक्रीसाठी नेण्याकरिता आंबा बागायतदारांसमोर अनंत अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. मंगळवारी तीनबत्तीनाका येथे दाखल झालेल्या हापूसची शेकडा 2500 रूपये दराने विक्री केली जात आहे. लॉकडाऊनमुळे हापूसच्या दरात घसरण झाली आहे. लॉकडाऊन संपुष्टात येताच हा दर आणखी वाढेल, अशी शक्यता आंबा बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
10 दिवसांपूर्वी दोन डझनाला 1 हजार रूपये दर आकारून हापूसची घरपोच विक्री होत होती. ग्राहकांनीही हापूस खरेदीला पसंती दिली होती. घरपोच मिळणाऱया सेवेमुळे ग्राहकही खूष होते. खाडीपट्टय़ातील बहुतांश गावांमध्ये हापूस तयार असूनदेखील शहरात विक्रीसाठी आणायचा कसा? अशी चिंता आंबा बागायतदारांना सतावत आहे. काही आंबा बागायतदारांनी ओळखीच्या गिऱहाईकांना गाठून घरपोच हापूसची विक्री करण्याची शक्कल लढवली आहे. ग्राहकांचीही सर्वाधिक पसंती मिळत असल्याने हापूसच्या दरात दिवसागणिक वाढ होत चालली आहे.
एरव्ही एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातच तीनबत्तीनाका येथे खाडीपट्टय़ासह दापोली तालुक्यातील गावातून हापूस विक्रीसाठी येथे दाखल होत होता. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हापूस तयार असूनदेखील शहराच्या ठिकाणी येण्याचे सर्व मार्ग बंद असल्याने हापूस पडून होता. मंगळवारी तीनबत्तीनाका येथे हापूस विक्रीसाठी दाखल झाल्याचे समजताच अनेक ग्राहकांनी हापूस खरेदीसाठी धाव घेतली. काही आंबा बागायतदारांनी शेकडा 2200 रूपये दराने आपल्या ओळखीच्याना घरपोच विक्री करण्याचा मार्ग अवलंबल्याने हातोहात हापूसची सर्वाधिक खरेदी झाली. लॉकडाऊन संपताच हापूस बाजारात दाखल झाल्यानंतर दरात वाढ होईल, असे देवसडे येथील आंबा व्यावसायिक सुधीर कदम यांनी सांगितले.