दांडगाईने तीन घरांवर हल्ला, काचा फोडल्या
प्रतिनिधी/ बेळगाव
मच्छे (ता. बेळगाव) येथे सोमवारी ग्रा. पं. सदस्यांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादावादीनंतर हाणामारीची घटना घडली असून त्यानंतर दांडगाईने हल्ला करुन तीन घरांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
गाजर नेण्यासाठी ग्रा. पं. पीडीओकडे परवानगी मागण्यासाठी आलेल्या एका ग्रामस्थावरून दोन सदस्यांमध्ये वादावादी झाली. वादावादीनंतर सायंकाळी एका सदस्याने दुसऱया सदस्यावर खुर्चीने मारहाण केली. रात्री दुसऱया गटाने तीन घरांवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.
या संबंधी मंगळवारी रात्री बेळगाव ग्रामीण पोर्लींस स्थानकाशी सपंर्क साधला असता एका सदस्याने फिर्याद दिली असून दुसऱया सदस्याने फिर्याद देण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात या संबंधीची चर्चा सुरू होती. पोलीस एकतर्फी वागत असल्याचा आरोपही केला जात होता.