दिवसाला 40 लीटर मोफत रस वाटप
प्रतिनिधी / मालवण:
सर्जेकोट मिर्याबांदा येथील सेवानिवृत्त शिक्षक गंगाराम आडकर यांनी मालवण सागरी महामार्ग येथे ‘जनता जनार्दन’ नावाने उसाचा गाडा सुरू केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कोळंब, रेवंडी, सर्जेकोट, हडी येथून मालवणात येण्यासाठी एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दुचाकीही बंद आहेत. सहा आसनी रिक्षा तेथील प्रवाशांना महत्वाचा आधार होता, तोही बंद आहे. त्यामुळे या ठिकाणचे प्रवासी उन्हातानातून चालत मालवणमध्ये येत आहेत. या लोकांना मोफत उसाचा रस देऊन त्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबविण्याचे आडकर सर यांनी ठरविले. रसवंतीगृहात येणाऱया जनता जनार्दनाची सेवा करत दिवसाला 35 ते 40 लिटर उसाचा रस मोफत वाटत आहेत.
माणुसकीचा धर्म पाळतो – आडकर
या सेवेबद्दल बोलताना आडकर सर म्हणाले, या मार्गावरून अनेक गाडय़ा जात होत्या. त्या गाडीतले प्रवासी माझे ग्राहक होते. या लोकांसाठी मी उसाचा रस विक्री करत होतो, मात्र आता लोकांचे हाल होत असल्याने त्यांच्याकडून पैशाची काय अपेक्षा ठेवायची? माझ्यासारख्या एका शिक्षकाकडून जनतेला उसाचा रस मोफत देण्याची सेवा होत असल्याने मला समाधान वाटत आहे. हा माणुसकीचा धर्म आणि ही सेवा लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत कायम ठेवणार आहे, असे सांगितले. ;