बाधिताचा मुंबईतून गावचा प्रवास रूग्णवाहिकेतून, पेढांबेत सहा दिवस होता संस्थात्मक क्वारंटाईन
वार्ताहर/ चिपळूण
मुंबईहून आलेला आणि सध्या पेढांबेमधील मंदार कॉलेजमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षात असलेला तरूण कोरोनो पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शनिवारी प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. सुमारे पावणेसातशे लोकवस्तीच्या पाली गावाच्या सीमा सकाळीच सील करण्यात आल्या. यापार्श्वभूमीवर पालीसह एकूण नऊ गावे कंटेन्मेंट, तर शहरासह आठ गावे बफरझोनमध्ये समाविष्ट करत आरोग्य विभागाची 17 पथके स्थापन करण्यात आली आहेत.
जिल्हय़ात रत्नागिरी, गुहागर व खेड वगळता कोरोनाबाधित अन्य तालुक्यांत नसल्याने लॉकडाऊनमध्ये काहीसा बिनधास्त वावरलेला चिपळूण तालुका मात्र शनिवारी हडबडून गेला. खांदाटपाली ग्राममपंचायत हद्दीतील व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानंतर शनिवारी सकाळी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेत सर्व विभाग कार्यान्वित केले. गाव आणि परिसराची माहिती घेत त्यानुसार नियोजन करण्यात आले.
निरबाडे, पाली फाटय़ावर नाकाबंदी
दरम्यान, सकाळी 10 वाजताच पाली गावच्या सीमा बंद करण्यात आल्या. निरबाडे मोहल्ला आणि पाली फाटा अशा दोनठिकाणी बॅरिकेट उभारत पोलिसानी नाकाबंदी केली. सर्व वाहतूक बंद करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी गावास भेट देत उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याकडून माहिती घेतली. गावात सकाळीच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. त्याचबरोबर नाकाबंदीबाबत उद्घोषणा केली जात असून पोलिसांनी गस्तही सुरू ठेवली आहे. खांदाटपाली गावात 24 तास नाकाबंदीकरिता दोन पोलीस अधिकारी व 21 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेन्मेंट व बफरझोनमधील गावांतील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दुपारनंतर यंत्रणा गावात
शनिवारी सकाळी गावचे पूर्णत: नियोजन केल्यानंतर दुपारी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव गावात दाखल झाले. ग्रामस्थांशी चर्चा करत रविवारपासून गावात प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले. यासाठी एकूण 17 पथके तयार करण्यात आली असून त्यामध्ये आरोग्य विभागासह अंगणवाडी सेविकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत घरांचा सर्व्हे करण्यात येणार असून एका पथकाकडून चौदा दिवस 50 लोकांची तपासणी केली जाणार आहे.
गावासह तीन कि. मी.चा परिसर कंटेन्मेंट झोन आणि पाच कि. मी.चा बफरझोन तयार करण्यात आला. कंटेन्मेंट झोनमध्ये खांदाट, पाली, नवीन कोळकेवाडी, दळवटणे ब्रीज, कळंबस्ते, वालोपे व खेड तालुक्यातील आंबडस, काडवली-हुमणेवाडी, काजवेवाडी, केळणे-गोमलेवाडी, तर बफरझोनमध्ये निरबाडे, पेढे, खेर्डी, चिपळूण शहर, उपनगर, धामणवणे व खेड तालुक्यातील चिरणी, भेलसई, केळणे, काडवली ही गावे समाविष्ट आहेत.
रूग्णवाहिकेतून मुंबई ते पाली प्रवास
पाली गावातील कोरोनाबाधीत तरूण मुंबई येथील काळाचौकी येथे आपल्या आई आणि बहिणीसह रहात होता. फूड पॉयझन झाल्याने 9 एप्रिलला त्याला मुंबईतील जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस तेथे त्याच्यावर उपचार करताना त्याच्या घेतलेल्या स्वॅबच्या नमुन्याचा अहवालही निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला 22 एप्रिलला घरी सोडण्यात आल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱयांनी होम क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. मात्र तरीही तो 23 एप्रिल रोजी आपल्या आई व बहिणीसोबत मुंबईहून रूग्णवाहिकेतून पाली या मूळगावी आला. येथे आल्यानंतर तो 24 रोजी बहिणीसह कामथे रूग्णालयात तपासणी करून पुन्हा घरी आला. त्यानंतर 25 एप्रिलला पेढांब येथील मंदार कॉलेजमध्ये दोघांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले.
पाली गाव आयसोलेट
खांदाट व पाली अशा दोन गावांची मिळून खांदाटपाली ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. यामध्ये पाली गावची लोकसंख्या ही 653, तर खांदाटची 800 इतकी आहे. बाधीत तरूण हा पाली येथील असून या गावात वरचीवाडी, खालचीवाडी, मधलीवाडी, भुवडवाडी आणि बौध्दवाडी अशा मिळून पाच वाडय़ा आहेत. येथे एकूण 255 घरे असून 248 एकूण कुटुंबे आहेत. यातील 67 घरे ही बंद आहेत.
मंदारमध्ये 58 क्वारंटाईन कोरोना रूग्ण आढळल्यानंतर पेढांबे येथील मंदार कॉलेजमधील विलगीकरण कक्ष निर्जतुकीकरण करण्यात आला आहे. मुंबई, पुणेसह इतरत्र ठिकाणाहून आलेल्या एकूण 58जणांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे. यातील सर्वांच्या घेण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांमध्ये 34जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर एक पॉझिटीव्ह आलेला आहे. उर्वरीत अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. कामथे रूग्णालयात आयसोलेशेन कक्षात दोनजण उपचार घेत आहेत. तसेच बाधित तरूणाला जिल्हा रूग्णालयात, तर घरी असलेल्या त्याच्या आईला शनिवारी