दिवसभरात पॉझिटिव्ह नाही; आणखी 950 अहवालांची प्रतीक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
रविवारी बेळगावला दिलासा मिळाला आहे. दिवसभरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला नाही तर 1665 पैकी 715 स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने तूर्तास सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आणखी 950 स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.
राज्य आरोग्य विभागाने रविवारी सायंकाळी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. राज्यात रविवारी दिवसभरात 31 अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये बागलकोट, गुलबर्गा व बेंगळूर येथील रुग्णांचा समावेश आहे. बेळगावचा एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे बाधितांची संख्या 73 वर स्थिरावली आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 6 हजार 767 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 4 हजार 107 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर 57 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन विभागामध्ये उपचार करण्यात येत आहेत.
आतापर्यंत जिल्हय़ातील 5 हजार 465 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये 4 हजार 406 अहवाल निगेटिव्ह तर 73 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. 15 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. शनिवारपासून 715 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी 950 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.