ऑनलाईन टीम / मालेगाव :
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच नाशिक मधील हॉटस्पॉट असलेल्या मालेगावातून दिलासादायक बातमी येत आहे. मालेगावात एकाच दिवसात तब्बल 51 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावातील 93 अहवाल आले असून त्यातील 90 अहवाल निगेटिव्ह आहेत. तर 3 जण पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे मालेगावातआतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 605 वर पोहचली असून एकूण 33 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
नाशिक शहरात आज दिवसभरात तीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिक मधील कोरोना रुग्णांचा आकडा 700 पार झाला आहे. तर कुंभारवाडा, गोसावीवाडी परिसर आणि सिद्धेश्वर नगर 14 दिवसांसाठी सील करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 100 झाली असून 6 हजार 564 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.