प्रतिनिधी/ बेळगाव
व्यावसायिक प्रवीण देसाई यांनी कॅम्प पोलीस स्टेशनमधील कोरोना योद्धय़ांचा शनिवारी सन्मान केला. शहरातील पहिला कोरोना रुग्ण कॅम्पमध्ये आढळूनही पोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे कोरोना नियंत्रणात आल्याने त्यांचा हा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खडेबाजार पोलीस स्थानकाचे एसीपी चंद्रप्पा व कॅम्प पोलीस स्थानकाचे इन्स्पेक्टर संतोषकुमार उपस्थित होते.
यावेळी बोलताना एसीपी चंद्रप्पा म्हणाले, शहरात कोरोनाचा शिरकाव झाला तो कॅम्पमधून. त्यामुळे पोलिसांवरचे दडपण वाढले होते. याकाळात सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टळल्याचे त्यांनी सांगितले. इन्स्पेक्टर संतोषकुमार म्हणाले, आमच्या कर्मचाऱयांनी दिवसरात्र मेहनत केली आहे. कडक निर्बंध घातले नसते तर कोरोना वाढला असता. यावेळी काही नागरिक दुखावले गेले आहेत, परंतु परिस्थितीच तशी होती, असे त्यांनी सांगितले.
प्रवीण देसाई यांच्या हस्ते सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तात्यासाहेब देसाई, आनंदस्वामी गडदेवरमठ, कॅन्टोन्मेंट सदस्य रिझवान बेपारी, अल्लाऊद्दिन किल्लेदार उपस्थित होते.