वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
भारताचा दुहेरीचा टेनिसपटू रोहन बोपण्णाने स्कॉलरशिपची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली असून यात सहभागी होणाऱया 60 मुलांना टेनिस व शिक्षण दोन्हीही एकाच ठिकाणी देण्यात येणार आहे. यासाठी 10 लाख रुपये वार्षिक फी ठेवण्यात आली आहे.
रोहन बोपण्णा टेनिस अकादमी (आरबीटीए) व द स्पोर्ट्स स्कूल यांच्या सहकार्याने ही योजना राबविली जाणार आहे. स्पोर्ट्स स्कूलच्या बेंगळूरमधील केंद्रावर शिक्षण व टेनिसचे प्रशिक्षण दोन्हीही दिले जाणार आहे. यू-12, यू-14 व यू-16 अशा तीन वयोगटातील मुलांना स्कॉलरशिपसाठी स्कूलच्या वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांची छाननी होईल आणि त्यानंतर निवडण्यात आलेले खेळाडू निवासी ट्रेनिंगमध्ये सामील होतील.
पहिल्या वर्षी एआयटीएचे मानांकन असलेल्या खेळाडूंनाच स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येणार आहे. प्रत्येक वयोगटात 20 मुलांना निवडण्यात येणार आहे.
कदाचित जगातील ही सर्वात मोठी स्कॉलरशिप योजना असून सर्व 60 खेळाडूंना शंभर टक्के पुरस्कृत केले जाणार आहेत.