यंदा 510 किलो भाजी बिण्यांचे लक्ष्य : सातही कृषी फार्मवर होणार निर्मिती
प्रतिनिधी / फोंडा
कृषी खात्यातर्फे यंदा सुधारीत भात शेतीबरोबरच गोव्याच्या गावठी भाज्यांच्या लागवडीसाठी विशेष योजना आखली असून गोव्यात उगवणाऱया विविध प्रकारच्या आठ भाज्यांची बियाणे तयार करून ती शेतकऱयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. साधारण 510 किलो भाजी बियाणे तयार करण्याचे कृषी खात्याचे उद्दिष्ठय़ असून कोडार फार्म बरोबरच राज्यातील कृषी खात्याच्या एकूण 7 फार्ममध्ये हा उपक्रम सुरु होणार आहे.
कृषी खात्याचे संचालक नेविल आल्फोंसो यांनी काल मंगळवारी कोडार येथील कृषी फार्मला भेट दिली. उपसंचालक चिंतामणी पेरणी यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. तांबडी भाजी, भेंडी, वाल, घोसाळे, कारली, गावठी काकडय़ा, कोकण दुधी, गावठी वांगी या भाज्यांचा त्यात समावेश आहे. यंदा कृषी खात्याच्या कोडार फार्मसह मडगांव, ओल्ड गोवा, काले, म्हापसा, पेडणे व वाळपई या सर्व सातही फार्मवर भाज्यांची ही बियाणी तयार होणार असून पुढच्या वर्षी पावसाळा सुरु होताच शेतकऱयांना ती वितरीत केली जाणार आहेत. राज्यात भाजी लागवडीला चालना देण्यासाठी कृषी खात्याने यंदापासून ही योजना हाती घेतली आहे. फोंडय़ातील कोडार फार्म हे सर्वात मोठे असल्याने याठिकाणी जास्त प्रमाणात बियाण्यांचे उत्पादन होणार आहे.
बियाणी, नांगरणीसाठी 50 टक्के सवलत
राज्यातील भातशेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी खात्याने विशेष भर दिला असून 400 मेट्रिक टन भात उत्पादनाचे लक्ष्य आहे. जया, ज्योती व कर्जत या भाताच्या बियाण्यांवर शेतकऱयांना 50 टक्के सवलत व नांगरणीच्या कामासाठीही 50 टक्के सलवत मिळणार आहे. भातशेतीबरोबरच नाचणी पिकाच्या शेतीलाही प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखली जाणार आहे.
रताळी व इतर कंदमुळांच्या लागवडीवर भर
गोवा राज्याला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी येथील स्थानिक व पारंपरिक फळे, भाजी व रताळय़ासारख्या पोषक जीवनसत्वे असलेल्या कंदमुळांचे सुधारीत उत्पादन व महत्त्व पटवून देण्यासाठी कृषी खात्याचे विशेष प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. अळुची माडी, रताळी, काटेकणगा, सुरण आदी कंदमुळांच्या उत्पादन वाढीवर भर दिला जाणार आहे.
फणस, शेवग्याच्या वाढीलाही देणार प्राधान्य
गोव्यातील कापा व रसाळ फणसापासून विविध खाद्यपदार्थांचे उत्पादन वाढीसाठी या फळाचा प्रचार व प्रसारासाठी विविध माध्यमातून प्रयत्न होणार असल्याचे ते म्हणाले. शेवग्याच्या शेंगांना सध्या मागणी असल्याने या शेगांचे उत्पादन कशाप्रकारे वाढविता येईल, यावरही सध्या विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
कोडार फार्मतर्फे यंदा 81 हजार कलमांचे लक्ष्य
कोडार कृषी फार्मचे एकूण क्षेत्रफळ 110 हेक्टर असून साधारण 57.5 हेक्टर मध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. काजू, नारळ व आंब्याच्या कलमांची लागवड कोडार फार्मवर जास्त प्रमाणात होत असून यंदा 81 हजार विविध झाडांची कलमे तयार करण्यांचे कोडार फार्मचे उद्दिष्ठय़ आहे. त्यामध्ये 20 हजार कवाथे, 14 हजार आंब्याची कलमे तर 15 हजार काजूच्या कलमांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षात कोडार फार्मने साधारण 40 हजाराहून अधिक कलमांची विक्री केली असून त्यातून साधारण रु. 26 लाख 32 हजार एवढा महसूल प्राप्त झाला आहे. चालू आर्थिक वर्षांत म्हणजे एप्रिल व मे या दोन महिन्यात विविध कलमे व रोपांच्या विक्रीतून रु. 10 लाख 9 हजारांचा महसूल जमा झाल्याची माहिती कोडार फार्मतर्फे देण्यात आली.