जिल्हय़ात सामुहिक संसर्गाचा धोका वाढला
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात सोमवारी शहरातील त्या हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्ट तरूणी कोरोना पॉझिटिव्ह मिळून आली. डॉक्टरपाठोपाठ रिसेप्शनिस्ट पॉझिटिव्ह आल्याने सामुहिक संसर्गाचा धोका वाढला आहे. त्या तरूणीच्या कुटुंबियांना कोरोटाईन केले आहे. तसेच रंकाळा टॉवर परिसरानंतर सोमवारी जुना बुधवार पेठ परिसर प्रतिबंधीत करण्यात आला आहे. या परिसरात औषध फवारणीही करण्यात आली आहे.
शहरासह जिल्हय़ात आजपर्यत कोरोनाच्या सामुहिक संसर्गाची घटना दिसून आलेली नव्हती, पण सोलापुरातून आलेल्या दांपत्याला खासगी हॉस्पिटलमध्ये वारंवार भेटायला गेल्याने रंकाळा टॉवर परिसरातील तरूण डॉक्टरला कोरोना झाला. त्याचा रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर रंकाळा टॉवर परिसर सील करण्यात आला. सोमवारी त्याच हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्ट (स्वागतिका) महिलेचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. तसेच कोरोनाच्या सामुहिक संसर्गाच्या धोक्यासंदर्भात भीती वाढली आहे.
रंकाळा टॉवर परिसरातील हॉस्पिटलमधील हा डॉक्टर महापालिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. पुरेशी दक्षता घेऊनही त्याला कोरोनाची लागण झाली, त्याचा स्वॅब रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आला. त्या डॉक्टराचे नातेवाईक सोलापुरातून कोल्हापुरात उपचारासाठी आले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी हा डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जात होता. कोरोनाची लक्षणे दिसण्यापुर्वी त्याने आपल्या खासगी रूग्णालयात तसेच महापालिकेच्या रूग्णालयातही रूग्ण तपासणी केली आहे. त्याच्याच हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्ट सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने सामुहिक संसर्गाची शक्यता पुढे आली आहे.
दरम्यान, त्या पॉझिटिव्ह महिला कर्मचाऱयाच्या अंबाई टँक परिसरातील सासरच्या कुटुबियांना तसेच जुना बुधवार पेठेतील तिच्या माहेरच्या कुटुंबियांना सोमवारी दुपारी क्वारंटाईन केले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. महिलेचे आईवडील, भाऊ, वहिनी, सहा महिन्याच्या बाळालाही क्वारंटाईन केले आहे. अंबाई टँक, जुना बुधवार पेठेतील डांगे गल्ली परिसरात औषध फवारणी केली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित डॉक्टरने महापालिका हॉस्पिटल आणि आपल्या खासगी हॉस्पिटलमध्ये सप्ताहभरात तपासलेल्या रूग्णांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संकलित केली जात आहे. या रूग्ण, त्यांच्यासोबत आलेल्यांचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.