नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंग्लंडमधील लीग क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना माझ्यावर देखील वर्णभेदी टिपणी झाली होती, असा ठपका माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्राने लावला आहे. आकाश चोप्रा 2007 मध्ये मेरिलबोन क्रिकेट क्लबकडून खेळला. दक्षिण आशियाई वंशाचा म्हणून आपल्याला पाकी असे संबोधले गेले, असा त्याचा दावा आहे. इंग्लिश बोलल्या जाणाऱया देशातून दक्षिण आशियाई नागरिकांसाठी हा शब्द वापरला जातो.
‘मी खेळत असताना एका प्रतिस्पर्धी संघात दोन आफ्रिकन खेळाडू होते आणि त्या दोघांनी मौजमस्तीचा सपाटाच लावला होता. मी एकदा नॉन-स्ट्रायकर एण्डवर असताना ते माझ्याच मागे लागले. ते सातत्याने मला पाकी या नावाने हाक मारत होते. इंग्लंडमध्ये पाकी कोणाला म्हणतात आणि त्यामागे त्यांचा दृष्टिकोन काय असतो, याची सर्वांनाच कल्पना आहे. त्या घटनेवेळी माझा संघ माझ्या पाठीशी उभा राहिला. पण, त्या खेळाडूंनी टिपणी केली, ही वस्तुस्थिती बदलली नाही’, असे चोप्रा याप्रसंगी म्हणाला. 42 वर्षीय आकाश चोप्राने भारतीय संघातर्फे 10 कसोटी सामने खेळले आहेत.