तिरुअनंतपुरम : केरळच्या 1,248 मंदिरांचे व्यवस्थापन हाताळणारे त्रावणकोर देवस्वोम बोर्ड उत्पन्न वाढविण्यासाठी मंदिरांचे सुमारे 1,200 किलो सोने बँकेत ठेवण्याची तयारी करत आहे. या सुवर्णठेवीमुळे बोर्डाला दरवर्षी सुमारे 13.5 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. हे सोने सध्या मंदिरांमध्ये दागिने तसेच भांडय़ांच्या स्वरुपात आहे.
या दागिन्यांना वितळवून ठोस सोने प्राप्त केले जाणार आहे. त्रावणकोर बोर्डाच्या अधिकारक्षेत्रात पद्मनाभम स्वामी, शबरीमला आणि गुरुवायूर यासारख्या मोठय़ा मंदिरांचा समावेश होतो. केरळच्या या मंदिरांमध्ये अत्यंत प्राचीन दागिने आणि ऐतिहासिक रत्ने आहेत. बोर्ड या प्राचीन महत्त्वाचे दागिने मात्र राखणार आहे. याचबरोबर बोर्ड 28 प्रमुख मंदिरांमध्ये ऑनलाईन दर्शन आणि सेवेची व्यवस्था करणार आहे. या सुविधेतूनही मंदिरांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
कोरोनामुळे उत्पन्न घटले
कोरोना विषाणू आणि टाळेबंदीमुळे बहुतांश मंदिरांमध्ये देगण्यांमध्ये घट झाली आहे. अशा स्थितीत मंदिरांना दैनंदिन खर्च आणि पुजाऱयांचे मानधन देण्यास अडचण होत आहे. अनेक ठिकाणी मंदिरे खुली झाल्याने स्थिती पूर्वपदावर येत आहे. परंतु मंदिरांना पूर्वीइतकी देणगी आणि उत्पन्न प्राप्त करण्यास बराच कालावधी लागू शकतो. केवळ शबरीमला मंदिराला टाळेबंदीदरम्यान 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
बोर्डाच्या बैठकीत निर्णय
मंदिरांमध्ये असलेल्या सोन्याच्या प्रमाणाची गणना केली जात आहे. हे प्रमाण 1200 किलोंपेक्षाही अधिक आहे. सुवर्णठेवींमुळे 2.5 टक्के परताव्यासह बोर्डाला 13 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्क्कम वर्षाला मिळू शकते. बोर्डाच्या बैठकीत यासंबंधी प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष एन. वासू यांनी सांगितले.