बोरी पंचायतीचे ग्रामस्थांना आवाहन
प्रतिनिधी / शिरोडा
बोरी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कोरोना महामारीच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी काही उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. पंचायत मंडळ व स्थानिकांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आरोग्य खात्याने घालून दिलेल्या कारोना संबंधी सर्व नियमांचे ग्रामस्थांनी सर्वाजनिक ठिकाणी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन या बैठकीतून करण्यात आले. तसेच घरमालकांनी आपल्या भाडेकरुंची सविस्तर माहिती पंचायत व पोलिसांना सक्तीने देतानाच नवीन भाडेकरु सध्याच्या परिस्थितीत ठेवू नये असा निर्णयही घेण्यात आला.
राज्याच्या सर्व सिमांवरील चेकनाके बंद करण्यासंबंधी लेखी सूचना सरकारला पाठविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. पंचायत क्षेत्रातील दुकानदारांनी खबरदारीचे उपाय म्हणून ग्राहकांना सामाजिक अंतर पाळण्याची सक्ती करतानाच फेसमास्क वापरल्याशिवाय सामान देऊ नये. पावसाळय़ात सिद्धनाथ पर्वत व आसपासच्या भागात कोसळणाऱया धबधब्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पिकनिकसाठी येणाऱया लोकांना बंदी घालावी, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली.
बोरी पंचायत क्षेत्रात कोरानाबाधीत रुग्ण आढळून आल्यास पंचायत क्षेत्रातील सर्व व्यवहार किमान चार दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्याची तयारी ठेवावी लागेली असे संकेतही देण्यात आले. बोरी येथील सरकारी आरोग्य केंद्रावर पूर्णवेळ डॉक्टरची नेमणूक करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. बैठकीला सरपंच भावना नाईक, उपसरपंच सुनिल सावकार, पंचसदस्य विनय पारपती, कमलाकांत गावडे यांच्यासह ग्रामस्थ दत्तेश नाईक, राहुल नाईक, परेश नाईक, केदार पेडणेकर, ब्रह्मा नाईक, माजी सरपंच मनुराय नाईक आदी उपस्थित होते.