तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
जिल्ह्यातील ग्रामीण भागात (महापालिका हद्द वगळून व बिगर प्रतिबंधित क्षेत्रातील) केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटीपार्लर उद्या, शनिवार पासुन सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी पुन्हा नविन नियम-अटी बंधनकारक आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी काढला आहे.
नविन नियम-अटींसह केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटीपार्लर सुरु होत आहेत. यामध्ये हेअर कट, हेअर डाय, व्हॅक्सिंग या कामांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर त्वचेशी संबंधित सेवा दाढी, फेशियल, मसाज या कामांना तूर्तास परवानगी देण्यात आली नाही. ज्या सेवा मिळणार नाहीत त्याची माहिती दर्शविणारा फलक दुकानाच्या दर्शनी भागावर ठळकपणे लावणे दुकानदारांना बंधनकारक आहे . या ठिकाणी काम करणाऱ्या चालक, कर्मचाऱ्यांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ग्लोज, ऍप्रन व मास्कचा वापर करावा. कामाच्या ठिकाणी खुर्च्या प्रत्येक वेळी सेवा दिल्यानंतर निर्जंतुक कराव्यात. दुकानातील वापरातील भाग, जमिनीचा पृष्ठभाग दर दोन तासांनी निर्जंतुक करावा. ग्राहकांसाठी डिस्पोजेबल टॉवेल, नॅपकिन याचा वापर करावा. नॉन डिस्पोजेबल साधनाचा प्रत्येक वापरानंतर निर्जंतुकीकरण करावे. तसेच सदरचे नियम व अटी न पाळणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.