वृत्तसंस्था / कोलकाता
2020 सालातील देण्यात येणाऱया अर्जुन पुरस्कारासाठी भारताचे ब्रिज खेळाडू प्रणब वर्धन आणि शिबनाथ सरकार यांची अखिल भारतीय ब्रिज फेडरेशनतर्फे शिफारस करण्यात आली आहे.
2018 च्या आशियाई क्रीडास्पर्धेत प्रणब वर्धन आणि सरकार यांनी ब्रिज या क्रीडाप्रकारात सुवर्णपदके मिळविली होती. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय ब्रिज फेडरेशनने क्रीडामंत्रालयाकडे अर्जुन पुरस्कारासाठी त्यांच्या नावांची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती अखिल भारतीय ब्रिज फेडरेशनचे सरचिटणीस के.एस. उर्फ आनंद सामंत यांनी दिली. 2018 च्या इंडोनेशियात झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत पहिल्यांदा ब्रिज या क्रीडाप्रकाराचा समावेश करण्यात आला होता. वर्धन आणि सरकार यांनी आशियाई क्रीडास्पर्धेत भारताला पुरूषांच्या दुहेरीच्या प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले होते. मात्र अद्याप राष्ट्रकुल किंवा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये ब्रिजचा समावेश करण्यात आलेला नाही पण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने विश्व ब्रिज फेडरेशनला अधिकृत मान्यता दिल्याचे सामंत यांनी सांगितले.