वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कझाकस्तानमध्ये गेल्या दोन आठवडय़ांच्या कालावधीत कोरोनाचा प्रसार पुन्हा झपाटय़ाने होत असल्याचे पाहून कझाकने 14 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर पेले. त्यामुळे येथील लीग फुटबॉल स्पर्धा बुधवारी सुरू केल्यानंतर पुन्हा दुसऱयांदा तहकूब करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे.
कोरोना महामारी संकटामुळे कझाकस्तानमध्ये गेल्या जवळपास साडेतीन महिन्यांच्या कालावधीत सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोनाची परिस्थिती थोडीफार सुधारल्यानंतर लीग फुटबॉल स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कझाकस्तानच्या शासनाने ही स्पर्धा सुरू करण्यास अधिकृत परवानगी दिली होती. बुधवारी लीग फुटबॉल पुन्हा सुरू केल्यानंतर प्रेक्षकांविना बंदिस्त स्टेडियममध्ये पाच सामने खेळविले गेले. कझाकस्तानमधील टोबोल आणि कॅस्पि या दोन संघातील फुटबॉलपटूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये अनेक फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. कोरोनाचा प्रसार पुन्हा नव्याने होत असल्याचे पाहून शासनाने संपूर्ण देशात चौदा दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू होईल. कझाकस्तानमधील व्यावसायिक फुटबॉल लीग स्पर्धा हंगाम 7 नोव्हेंबरला संपविण्याचा प्रयत्न चालू आहे. या देशामध्ये आतापर्यंत कोरोनाची 44 हजार लोकांना बाधा झाली असून 188 जणांचा बळी गेला आहे.