प्रतिनिधी/ बेळगाव
शहर व जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. शुक्रवारी आणखी 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकूण बाधितांची संख्या 350 वर पोहोचली आहे. यामध्ये कोविड वॉर्डमध्ये सेवा बजावलेली परिचारिका, लूटमार प्रकरणी कॅम्प पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानक सीलडाऊन करण्यात आले आहे.
शुक्रवारी करिकट्टी, ता. सौंदत्ती येथील आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वाडीशाडय़ाळ, ता. हुक्केरी येथील एक तरुण, मजगाव येथील तरुण, सदाशिवनगर येथील परिचारिका, कुदेमनी येथील एक इसम व मजगावातीलच एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या नऊ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 306 वर पोहोचली असून सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 48 बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या 13 जणांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 27 हजार 633 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 9 हजार 769 जणांना चौदा दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर आणखी 2 हजार 379 जणांचे अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे चौघा जणांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी दड्डी-कोट येथील दोघेजण, मरणहोळ, निपाणी, हुबळी, वडगाव, कोडणी येथील एकूण नऊ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. पुढील चौदा दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला आहे. बेळगाव जिल्हय़ातही रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असून त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या एक 60 वषीय वृद्ध व 35 वषीय महिलेला कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली, याचा उलगडा झाला नाही. तर हुबळी-धारवाडहून आलेल्या 29 वषीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कॅम्प पोलिसांनी लूटमार प्रकरणी तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शुक्रवारी कॅम्प पोलीस स्थानकाला सीलडाऊन करण्यात आले आहे तर पोलीस निरीक्षकांसह 11 जणांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले आहे. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातही खबरदारी घेण्यात आली असून नव्या कैद्यांना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
संशयिताला अटक करणाऱया पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱयांना कोरोनाची धास्ती वाटू लागली आहे. आता त्यांचीही स्वॅब तपासणी केली जाणार आहे. त्यासंबंधी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्याशी संपर्क साधला असता पोलिसांनी कोरोनाविरुद्ध लढताना स्वतःही काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.