जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई, मोठे यश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
14 फेब्रुवारी 2019 या दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या आणखी एका प्रमुख सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात 40 सैनिक हुतात्मा झाले होते. बिलाल अहमद कुचेरी असे या सूत्रधाराचे नाव असून तो लाकडाच्या वखारीचा मालक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संशयित पुलवामाचाच रहिवासी असून त्याने या हल्ल्यात सहभागी असणाऱया दहशतवाद्यांना आसरा दिला होता, तसेच त्यांना दूरध्वनी संच पुरविले होते. कुचेरी याला या कटाची पूर्ण माहिती होती असा दावा केला जात आहे. त्याला गेल्या सोमवारी ताब्यात घेण्यात आले. तो या भागातील सधन उद्योजक आहे.
अदिल अहमद याच्याशी संबंध
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांना घेऊन जाणाऱया बसवर स्फोटकांनी भरलेली कार आदळवून हा हल्ला करण्यात आला होता. कार आदळवण्याचे कृत्य अदिल अहमद याने केले होते. तोही या आत्मघाती हल्ल्यात ठार झाला होता. बिलाल कुचेरी याचे अदिल अहमद याच्याशी नजीकचे संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. कुचेरी याच्याकडून या कटाची आणखी माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी सहा जणांना अटक
मार्च 2020 मध्ये पुलवामा हल्लाप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. मोहम्मद इक्बाल राथेर या सहाव्या बडगामवासी संशयिताला 2 जुलैला अटक करण्यात आली होती. राथेर यांना पाकिस्तानातून स्फोटके आणली होती असा आरोप आहे. अशा प्रकारे आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे.