दंडोबा डोंगरावर प्रेमी युगलांना पोलिसांचा चोप
प्रतिनिधी / खंडेराजूरी
तब्बल साडेतीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळलेल्या आणि दुरावलेली मनं जुळविण्यासाठी निसर्गरम्य वातावरणात दंडोबा डोंगरावर आलेल्या अतिउत्साही प्रेमी युगलांना पोलिसांनी अक्षरश: बदडून काढलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दंडोबा डोंगरावर प्रवेशबंदी असताना मद्यपी व प्रेमीयुगलांची गर्दी उसळत आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ पोलिसांनी हुल्लडबाजांना लाठ्यांचा प्रसाद देउढन डोंगरावरुन पिटाळून लावले. गुलाबी प्रेमाच्या आठवणीत हरवून गेलेल्या प्रेमी युगलांवर अचानक लाठ्या पडू लागल्याने काही जण स्वत: गाड्या टाकून डोंगरातून सैरभैर पळू लागले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्वच तिर्थस्थळ आणि पर्यटन स्थळांवर येण्यास बंदी आहे. जिल्हाबंदी असल्यामुळे फिरायला जवळचे ठिकाण म्हणून मिरज, कवठेमंकाळ तालुक्याच्या सीमेवरील दंडोबा डोंगरावर गेल्या पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगल आणि मद्यपींनी गर्दी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका, असे आवाहान करूनही सांगली, मिरज शहरातील व परिसरातील अनेक युवक-युवती, मद्यपींनी मात्र दंडोबा डोंगरावर धिंगाणा घातला होता. त्यामुळे दंडोबा डोंगरचे पावित्र्याला बाधा येत होती. विविध गावांमधून आलेल्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली होती.
कवठेमंकाळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दंडोबा डोंगरावर नजर ठेवली. त्याचवेळी डोंगरामध्ये मद्यपी व प्रेमीयुगलांचा जोरदार राबता असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अनेक युवक-युवती व मद्यपींना चोप देण्यास सुरुवात केली. पोलीस आल्याचे कळताच गुलाबी प्रेमाच्या आठवणीत रमलेले अनेक प्रेमीयुगले गाड्या टाकून डोंगरातून सैरभर पळू लागले. पोलिसांनी चोप दिल्यानंतर डोंगरात लपलेल्या प्रेमीयुगलांना बोलावून पुन्हा डोंगरावर न येण्याचा दम देऊन त्यांच्या गाड्या परत दिल्या.