प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलीस प्रशासनाने पूर्वीपेक्षा कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी एकाच दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱयांकडून जिल्हय़ात 5 लाख 88 हजार 250 रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. तर सातारा शहर व परिसरात दुचाकीवरून डबलसीट प्रवास करणाऱया 65 दुचाकी बुधवारी जप्त करण्यात आल्या आहे. 665 दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1 लाख 99 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सातारा जिह्यामध्ये विविध ठिकाणी मास्क न वापरणाऱया 243 नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून 96 हजार 150 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सिगारेट व तंबाखूजन्य प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत 99 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 20 हजार 800 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱया 34 व्यक्तींकडून 9 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुचाकीवर एकाच व्यक्तीने व चारचाकी वाहनातून तीन व्यक्तीना प्रवास करण्याची परवानगी असताना डबल सीट फिरणाऱया 54 दुचाकी चालकांवर 10 हजार 800 तर 10 चारचाकी चालकांकडून 2 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विनाकारण फिरणाऱया 286 दुचाकी व 5 चारचाकी वाहने जप्त केली आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन प्रकरणी 1856 वाहनधारकांकडून 4 लाख 49 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणायांकडून 5 लाख 88 हजार 250 रुपयांचा दंड एकाच दिवसात वसूल करण्यात आला आहे. मास्कबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात एक, सोशल डिस्टनचे पालन न केल्याने भुईंज व शाहूपुरी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक, सिगारेट व तंबाखूजन्य प्रतिबंधक अधिनियम अन्वये तीन व चारचाकी वाहनातून तीनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी फलटण ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहितीही सातपुते यांनी दिली.
दरम्यान, सातारा शहरात रविवार पेठ, शहर परिसरात संगमनगर, वनवासवाडी या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी सातारा शहर वाहतूक शाखेने धडक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला गती देत आरसीबीआय या पोलिस दलातील पथकाला सोबत घेऊन बॉम्बे रेस्टॉरंट, राजवाडा, पोवई नाका, वाढे फाटा, अजंठा चौक परिसरात दुचाकीवरून डबलसीट प्रवास करणाऱयां कारवाई करण्यात आली. रात्री 7.30 वाजेपर्यंत शहर व परिसरात डबलसीट प्रवास करणाऱया 65 दुचाकी जप्त करण्यात आली असून 665 दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1 लाख 99 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.