वार्ताहर / दोडामार्ग:
दोडामार्ग बाजारपेठेसोबत संपूर्ण शहर परिसरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱया गुरांना सोमवारी अखेर माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व नागरिकांनी स्वतः पकडले व नगरपंचायतीच्या आवारात नेऊन मुख्याधिकाऱयांच्या ताब्यात दिले. कठोर शब्दात अधिकाऱयांना सुनावत नानचे यांनी चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, कोंडवाडय़ा संदर्भातील तिसरी निविदा काढण्यात आली असून त्याची कार्यवाही झाल्यावर मोकाट गुरांचा बंदोबस्त करता येईल, असे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही महिन्यांपासून दोडामार्ग बाजारपेठेत व शहर परिसरात फिरणाऱया मोकाट गुरांचा त्रास सर्वांनाच होत आहे. रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी तसेच छोटे-मोठे वाहन चालक, विशेषतः व्यापारी, दुकानदार यांना या गुरांचा खूप त्रास सहन करावा लागत असे. दोडामार्ग नगरपंचायतीने या मोकाट गुरांकडे व्यवस्थित लक्ष दिले नसल्याचा आरोपही वेळोवेळी होत राहिला. या मोकाट गुरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासंदर्भात नगरपंचायतीचे लक्ष वेधण्यासाठी नानचे यांनी निवेदने तसेच प्रसंगी आंदोलने, उपोषणे देखील केली होती. परंतु त्यासंदर्भात काही हालचाली होत नव्हत्या. उलट मोकाट गुरांचा त्रास आणखीनच वाढला होता. बाजारपेठ परिसरात फिरणाऱया या गुरांमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते तसेच दुकानात बाहेर असलेल्या खाद्य सामग्रीचा माल तोंडात धरून ओढून घेण्याइतपत प्रकार घडले होते. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवरी नानचे तसेच बाळा कोरगावकर, आनंद ताटे, मिलिंद नाईक, दिनेश खरवत, परेश कोरगावकर आदी नागरिकांनी बाजार परिसरातील मोकाट गुरांना पकडले व थेट नगरपंचायतीच्या आवारात नेले.