गोवा शालान्त मंडळ प्रस्ताव सरकारकडे पाठविणार
प्रतिनिधी / पणजी
नववी ते बारावी या चार इयत्तेमधील अभ्यासक्रमात सुमारे 30 टक्के कपात करण्याचा प्रस्ताव गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) आखला असून त्या प्रकरणी पुन्हा एकदा बैठक घेऊन नंतरच तो सरकारकडे पाठवण्याचे ठरविले आहे.
गोवा बोर्डाने हा प्रस्ताव ‘बोर्ड ऑफ स्टडीज’कडे पाठवला असून त्या प्रस्तावास बहुतेक सदस्यांनी मान्यता दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून सध्या हा निव्वळ प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले. जून पूर्ण महिना तसेच जुलैचा अर्धा महिना मिळून एकूण दीड महिन्याचा शैक्षणिक कालावधी वाया गेला असून शैक्षणिक वर्ष, शाळा केव्हा सुरू होणार याचा पत्ता सरकारला आणि शिक्षण खात्याला नाही. त्यामुळे सीबीएससीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुढे जाण्याचे गोवा बोर्डाने ठरविले आहे.
गोवा बोर्डाशी संलग्न असलेल्या ऍकेडॅमिक कौन्सिल, बोर्ड ऑफ स्टडीजने या 30 टक्के अभ्यासक्रम कपातीस हिरवा कंदिल दर्शविला असून त्यावर शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. कपात करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची माहिती कालांतराने सर्व शाळांना पाठविण्यात येणार आहे. गोवा बोर्ड स्वायत्त संस्था असल्याने त्याच्या निर्णयात सरकार हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे 30 टक्के कपातीचा निर्णय हा अंतिम असल्याचे सूत्रांनी नमूद केले. बारावी इयत्तेमधील फिजिक्स, कॅमेस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स या विषयातील अभ्यासक्रमातही 30 टक्के कपात होणार आहे.
दरम्यान, दहावी परीक्षेचा निकाल 20 ते 22 जुलैपर्यंत जाहीर केला जाणार असल्याची शक्यता सूत्रांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे अकरावीच्या वर्गांनादेखील उशिराच सुरू करणे भाग पडणार आहे.