वृत्तसंस्था /चेन्नई :
कोरोना महामारीच्या विरोधात लढण्यासाठी आयआयटी मद्रास आणि स्टार्टअप मॉडय़ूलस हाउसिंगने एक पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले आहे. हे हॉस्पिटल केवळ 4 तासांमध्ये निर्माण करता येणार आहे. कोरोनाविरोधी लढय़ात पोर्टेबल हॉस्पिटल मेडिकॅब ‘गेमचेंजर’ ठरू शकते. मेडिकॅबद्वारे स्थानिक पातळीवर कोरोनाबाधितांचा शोध घेणे, स्क्रीनिंग करणे, आयसोलेशन आणि उपचारात मदत मिळणार आहे.
पोर्टेबल हॉस्पिटल अलिकडेच केरळच्या वायनाडमध्ये सादर करण्यात आले आहे. तेथे याच्या युनिट्स कोरोनाबाधितांच्या उपचाराकरता तैनात करण्यात आल्या आहेत. मायक्रो हॉस्पिटल विकसित करत ग्रामीण भागातही उपचार उपलब्ध करण्याचे लक्ष्य पूर्ण करता येणार आहे.
मेडिकॅब पूर्णपणे फोल्डेबल आणि 4 हिस्स्यांमध्ये निर्माण करण्यात आले आहे. यात डॉक्टरांचा एक कक्ष, आयसोलेशन कक्ष, वैद्यकीय कक्ष आणि 2 बेडयुक्त अतिदक्षता विभाग सामील आहे. फोल्डेबल असल्याने मेडिकॅबच्या वाहतुकीकरता अल्प खर्च येणार आहे. स्टार्टअपसाठी श्री चित्रा इन्स्टीटय़ूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीशी भागीदारी करण्यात आल्याचे आयआयटी मद्रासकडून सांगण्यात आले आहे.
स्मार्ट आरोग्य सुविधा
केरळमध्ये या प्रायोगिक प्रकल्पाच्या परिणामांमुळे तंत्रज्ञानाचे लाभ आणि मायक्रो हॉस्टिपलची सद्यकाळातील गरज अधोरेखित झाली. मेडिकॅप एक आवश्यक आणि तत्काळ निर्माण होणारी सुविधा म्हणून सिद्ध करण्यास मदत मिळाली आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात स्क्रीनिंग आणि उपचारासाठी स्मार्ट आरोग्य सुविधेची मोठी गरज असल्याचे मॉडय़ूलस हाउसिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम रविचंद्रन यांनी म्हटले आहे.