वेलिंग-प्रियोळ पंचायतीने घातला नवीन पायंडा : 50 खाटांची सोय करणार
प्रतिनिधी / फोंडा
राज्यात कोरोनाबाधीतांचा आकडा झपाटय़ाने वाढत आहे. या रुग्णांवर उपचार करणाऱया कोविड इस्पितळात व दक्षिण गोव्यातील सर्व कोविड निगा केंद्रामध्ये जागा अपुऱया पडत आहेत. अशा कठिण परिस्थितीवर उपाय काय ? याचे उत्तर फोंडा तालुक्यातील वेलिंग-प्रियोळ ग्रामपंचायतीने शोधले आहे. पंचायत क्षेत्रात आढळणाऱया कोरोनाबाधीत रुग्णांची सरकारी कोविड केंद्रात व्यवस्था होईपर्यंत गावातच सोय करण्याचा निर्णय पंचायतीने घेतलेला आहे.
प्रियोळ पंचायत क्षेत्रात सध्या नऊ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी सात जणांवर फर्मागुडीतील सरकारी कोविड निगा केंद्रात जागा उपलब्ध नसल्याने घरातच राहून उपचार घेण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत इतर कुटुंब सदस्यांना संसर्ग होण्याचा धोका तर आहेच. शिवाय शेजाऱयांमध्ये भिती व चिंता वाढत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन प्रियोळ पंचायत मंडळाने रविवारी तातडीची बैठक घेऊन त्यावर उपाय शोधला. राज्यात सध्या कोरोनाच्या लढय़ात आघाडीवर लढणारे न्यायवैद्यकीय तज्ञ डॉ. मधू घोडकिरेकर यांना बोलावून कोरोना महामारीचा संसर्ग व त्यापासून बचावाच्या उपाययोजनासंबंधी सल्ला घेतला. सर्व पंचसदस्यांना विश्वासात घेऊन पहिल्या टप्प्यात म्हार्दोळ येथील पंचायत सभागृहात कोविड निगा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णसेवेसाठी लागणारे ऑक्सिमिटर, मदतनिसासाठी लागणारा पीपीई किट, रुग्णवाहिकीची व्यवस्था या सर्व गोष्टी पंचायतीला मिळणाऱया आपत्कालीन व्यवस्थापन निधीतून केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 खाटांची व्यवस्था करण्यात येणार असून औषधे व उपचारासंबंधी लागणारी मदत आरोग्य खात्यातील डॉक्टर्सकडून घेतली जाईल. रुग्णसंख्या वाढल्यास पंचायत क्षेत्रातील मंदिराचे सभागृह, शाळा याठिकाणीही कोरोना सेवा केंद्रे उभारण्याची तयारी पंचायतीने ठेवल्याची माहिती सरपंच पांडुरंग गावडे यांनी दिली. या सेवा केंद्रावर राहण्याची व उपचारासंबंधी व्यवस्था केली जाईल. मात्र जेवणाची व चहा नास्त्याची सोय कुटुंबियांना करावी लागेल. उपचार घेऊन त्यातून बरे होणाऱया रुग्णांनी या कार्यासाठी मदतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पंचयात क्षेत्रात कोरोनाबाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुरुवातीला लॉकडाऊन करण्याचा विचार होता. पण त्यातून प्रश्न सुटणार नाही हे कळून चुकल्यावर कोविड रुग्ण सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे कुटुंब मोठे आहे व घरात पुरेशी जागा नाही, त्यांची सोय याठिकाणी केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंचायत व नगरपालिकांनी सेवा केंद्रे उभारावीत
पंचायत क्षेत्रातील कार्यक्षम पंचसदस्य व प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर यांनी या कोविड सेवा केंद्रासंबंधी माहिती देताना सांगितले की, नगर प्रियोळ भागात सुरुवातीला दोन रुग्ण सापडले होते. त्यांची मडकई आरोग्य केंद्रात तपासणी केल्यानंतर फर्मागुडी येथील कोविड निगा केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती. त्याच कुटुंबातील अजून सात रुग्ण वाढले. पण फर्मागुडीतील निगा केंद्रात खाटा उपलब्ध नसल्याने त्यांची तपासणी करुन घरीच क्वॉरंटाईन करण्यात आले. अशा परिस्थितीत गावात भितीचे वातावरण पसरले. शिवाय संसर्ग वाढण्याचा धोका होताच. ही गोष्ट लक्षात घेऊन पंचायतीनेच कोविड निगा केंद्राची सोय करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी डॉ. मधू घोडकिरेकर यांचा सल्ला घेण्यात आला. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातील सरकारी कोविड इस्पितळ व निगा केंद्रातील जागा पूर्ण भरलेल्या आहेत. त्यामुळे यापुढे प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपालिकेने आपापल्या क्षेत्रातील रुग्णांची काळजी घेण्यासाठी कोविड सेवा केंद्रे उभारण्याची गरज आहे. ज्यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल.
आपत्कालीन परिस्थितीत स्वराजसंस्थाची भूमिका महत्त्वाची
राज्यात ज्या झपाटय़ाने कोरोना रुग्ण वाढत आहेत, ते पाहिल्यास कोविड निगा केंद्रे प्रत्येक पंचायत पातळीवर होणे अनिवार्य असल्याचे डॉ. मधू घोडकिरेकर यांनी सांगितले. या महामारीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीशी झुंजण्यासाठी केंद्र सरकारने ऍपिडेमिक कायदा व मास डिसास्टर कायदा लागू केला आहे. त्यापैकी मास डिसास्टर कायद्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाची भूमिका महत्त्वाची आहे. सरकारी आरोग्य यंत्रणाशी संमातर किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून राज्यातील ग्रामपंचायती व नगरपालिकांनी कोविड सेवा केंद्राची जबाबदारी उचलण्याची हीच वेळ आहे. ज्या रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही, पण त्यांना प्रथमोपचार व निगेची गरज आहे, अशा रुग्णांना पंचायतीच्या या सेवा केंद्रामध्ये ठेवणे शक्य आहे. प्रियोळ पंचायत क्षेत्रातील काही लोकवस्त्या कुळागारी भागात वसल्या आहेत. तेथे घरीच क्लॉरंटाईन झालेल्या एखाद्या रुग्णाची प्रकृती बिघडल्यास घरापर्यंत रुग्णवाहिका नेणे शक्य नाही. शिवाय ज्या रुग्णांच्या घरात ऍटॅच टॉयलेट बाथरुमची सोय नाही. जेथे दाट लोकवस्ती व मोठय़ा कुटुंबात राहणाऱया रुग्णांच्या देखरेखीसाठी पंचायत क्षेत्रातील कोविड निगा केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत, असे डॉ. घोडकिरेकर यांनी स्पष्ट केले. इतर पंचायती व नगरपालिकांनी त्यासाठी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.