वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मल्लांसाठी राष्ट्रीय कुस्ती शिबिराचे आयोजन ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात करण्यात येणार असून सर्व मल्लांना त्यावेळी एकत्र येण्यास सांगण्यात आले आहे. ट्रेनिंगला सुरुवात करण्याकरिता तारीख निश्चित करण्यासाठी साईने भारतीय कुस्ती फेडरेशनसमवेत (डब्ल्यूएफआय) काम सुरू केले आहे.
गेल्या जूनमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर क्रीडा मंत्रालयाने 57 राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन्सची मान्यता काढून घेतल्यामुळे साईने वैयक्तिक क्रीडा प्रकाराची शिबिरे आयोजित करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ऑलिम्पिक वजन गटासाठी प्रथम शिबिर सुरू करण्यात येणार असून क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्याची सुरुवात केली जाणार आहे. ‘अनेक मल्ल सध्या वैयक्तिक ट्रेनिंग घेत असून हा महिना संपेपर्यंत शिबिर घेतले जाऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात शिबिर घेण्याची योजना आम्ही आखली आहे,’ असे डब्ल्यूएफआयचे सरचिटणीस विनोद तोमर यांनी सांगितले.
पुरुषांचे शिबिर सोनिपत, हरियाणा येथे तर महिलांचे शिबिर लखनौ, उत्तर प्रदेश येथे घेतले जाणार आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सर्व मल्लांनी या शिबिरास हजर होणे आवश्यक आहे. येत्या डिसेंबरमध्ये वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिप सर्बियातील बेलग्रेड येथे होणार आहे. पण ती होण्याबाबत साशंकताच आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिबिरासाठी घाई करण्याची गरज नाही, याची आम्हाला जाणीव आहे, असे तोमर यांनी म्हटले आहे.