पेडणे तालुक्याला पुराने वेढले : सर्वाधिक 10 इंच एवढी विक्रमी नोंद : मांडवीच्या पाणी पातळीत वाढ : आजही कोसळणार मुसळधार पाऊस : अधिकाऱयांकडून पूरसदृश्य स्थितीची पाहणी मच्छीमारांना समुद्रात जाणे टाळण्याचा सल्ला
प्रतिनिधी / पणजी
मुसळधार पावसाने राज्यात सर्वत्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पेडणेत गेल्या 24 तासात 10 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली. तालुक्यातील अनेक भागांना पुराने वेढले. तिळारीतून विसर्ग झाल्याने साळ, इब्रामपूर, कोलवाळ, धारगळ आदी भागात पुराचे पाणी घुसले. वाळवंटी नदीत विर्डीहून आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे केरी, पर्ये भागात पुराने अनेक घरांना वेढले. सांखळीत आलेल्या पुराचा जोर दुपारनंतर ओसरला. दुपारपासून पावसाचा जोर थोडा मंदावल्याने गोव्यातील अनेक भागात आलेला पूर थोडाफार ओसरला. संपूर्ण गोवाच वादळी वाऱयासह आलेल्या पावसाने जलमय झाला. सांखळी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तर साळ भागात सभापती राजेश पाटणेकर यांनी आणि इब्रामपूर, धारगळ व पेडणे तालुक्यातील अनेक भागांना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.
गेले 4 दिवस चालू असलेल्या पावसाने गेल्या 24 तासात आपला जोर वाढविला. बुधवारी दुपारपासून मात्र पावसाने थोडी उसंत घेतली. मंगळवारी रात्रभर मुसळधारपणे कोसळलेल्या पावसाने संपूर्ण गोव्याला अक्षरशः झोडपून काढले. तर पेडणे तालुक्यात पावसाने कहर केला. गेल्या 24 तासात 10 इंच एवढी या वर्षातली विक्रमी नोंद केली. जोरदार वादळी वाऱयासह पडलेल्या पावसाने पेडणे तालुक्यातील अनेक भाग जलमय झाले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी झाडांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. त्यामुळे घरांचे, वीज खात्याचे तसेच अन्य मालमत्तेची बरीच मोठी नुकसानी झाली आहे.
तिळारी धरण परिसरातही मुसळधार पाऊस
गेले 4 दिवस कोसळत राहिल्याने तिळारी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी शापोरा नदीला पूर आला. त्याचे पाणी डिचोली तालुक्यात साळ व आदी भागात सर्वत्र पसरले. अनेक घरांना धोका निर्माण झाला. गेल्यावर्षी तिळारी प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने त्या परिसरातील नागरिक रात्रभर जागेच राहिले होते. सकाळपासून पुराचा जोर वाढत गेला व सायंकाळी पुराचे पाणी ओसरले.
वाळवंटी नदीला बुधवारी मोठा पूर
सांखळीच्या वाळवंटी नदीला बुधवारी मोठा पूर आला. विर्डी (महाराष्ट्र) येथून पाण्याचा मोठा प्रवाह वाळवंटीला येऊन मिळतो. त्यातून पुराचे प्रमाण वाढले. केरी व पर्ये भागातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले. घोटोलीच्या पुलावरून पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहतूक बंद झाली. सायंकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले व पूर ओसरला. सांखळी येथे वाळवंटी नदी धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेली. सांखळी बाजाराच्या बाजूने संरक्षक भिंत असल्याने पुराचे पाणी तिथे पसरले नाही. विठ्ठलापूरच्या दिशेने पुराचे पाणी सर्वत्र पसरले, दुपारनंतर सायंकाळी पूर ओसरला.
मांडवी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ
बुधवारी भरतीच्या वेळी व पुराच्या पाण्याचा सर्व बाजूनी होणारा वाढता प्रवाह यामुळे मांडवी नदीच्या पाण्याची पातळी बरीच वाढली. अनेक फेरी धक्के पाण्यात अडकले. अखेरीस पणजी-बेती, रायबंदर-चोडण, रायबंदर-दिवाडी आदी जलमार्गावरील फेरीसेवाच बंद करण्यात आली. मांडवी नदीच्या पाण्याची पातळी एवढी वाढली की महामार्गापर्यंत पाणी पोहोचले. दिवाडी, चोडण आदी भागातील रस्तेही पाण्याखाली गेले. त्यामुळे लोकांचे हाल झाले. म्हापसा परिसरातील सर्व शेती बुधवारी पाण्याखाली गेली होती. सर्व परिसर जलमय झाला होता.
पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार वादळी वाऱयासह मुसळधार पाऊस पडेल. समुद्र खवळलेला राहील. मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे कळविण्यात आले आहे. आमच्याच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्वच भागाना पावसाने झोडपून काढले आहे.
पेडणे तालुक्यात पावसाचा उच्चांक
यंदाच्या मौसमात पेडणे केंद्रावर सर्वाधिक पाऊस झाला. बुधवारी पेडणेमध्ये 10 इंच पावसाची नोंद झाली. फोंडा व सांखळी मध्ये प्रत्येकी 4.5 इंच, वाळपई व केपे येथे प्रत्येकी 4 इंच, जुने गोवे येथे 3.5 इंच तर मडगावात 3 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा व पणजीत प्रत्येकी 2.5 इंच मडगावात 2 तर काणकोण मध्ये 1.5 इंच पाऊस झाला. पेडणेत गेल्या 24 तासात 10 इंच पावसानंतर तिथे एकूण पडलेला पाऊस आता 123 इंच झाला आहे.
पावसाने शंभरी ओलांडलेली ठिकाणे
पेडणे 123 इंच
जुने गोवे 112.26 इंच
पणजी 101.5 इंच
सांखळी 108.55 इंच
काणकोण 107 इंच
केपे 105 इंच