प्रतिनिधी/ लांजा
तालुक्यातील प्रसिद्ध खोरनिनको धबधबा या पर्यटन स्थळावर पर्यटकांकडून मनाई आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रभानवल्ली येथे लांजा पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. सूचना देऊनही धबधबा क्षेत्रावर आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी माघारी धाडले.
येथे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून 1 ऑगस्टपासून नाकाबंदी करण्यात आली आहे. यापूर्वी खोरनिनको ग्रामपंचायतीच्यावतीने धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीचे बंदी आदेश झुगारुन धबधब्यावर पोहोचत होते. यामुळे जिल्हाभरातील पर्यंटक दाखल होऊ लागले. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता धबधब्यावर जाणाऱया हौशी पर्यटकांना पोलिसांचा चांगलाच दणका मिळाला आहे.
कोरोना महामारीमुळे जिह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर खोरनिनको धरणावर जाण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे. मात्र खोरनिनको धबधब्याच्या ठिकाणी खूप वर्दळ वाढली होती. प्रशासनातील अधिकारी तसेच राजकीय पुढारी आपले नातेवाईक यांना घेऊन धबधबा सफर करत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी खोरनिनको धरणावर येणाऱया पर्यटकांबाबत तक्रारी करूनही ग्रामसेवक आणि सरपंच यानी दुर्लक्ष केले होते. अखेर पाटबंधारे विभागाने येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, यासाठी लांजा पोलीस यांना पत्र दिले होते. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर लांजा पोलिसानी खोरनिनकोला जाणाऱया प्रभानवल्ली वाघजाई मंदिर रस्त्यावर नाका बंदी केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे. लांजा पोलीस निरीक्षक संजय चौधरी यानी आपल्या सहकाऱयांसमवेत प्रभानवल्ली व खोरनिनको येथे पेट्रोलिंग करून या ठिकाणी जाणाऱया पर्यटकांना रोखून माघारी पाठवले.