वार्ताहर/ संगमेश्वर
फुगणूस ग्रामपंचायतीत 14व्या वित्त आयोगातून केलेली भोसलेवाडी येथील पाखाडी दुसरीकडे वळवून सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांनी दिशाभूल केली. यासाठी त्यांचे निलंबन करण्यात यावे अन्यथा 15 ऑगस्ट रोजी पंचायत समिती दालनासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
फुणगूस भोसलेवाडी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गिरवणे भोसलेवाडीसाठी मंजूर झालेली पाखाडी त्या वाडीत न बांधता सरपंचांनी परस्पर आपल्या नवीन घराकडे वळवली आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी आलेल्या विस्तार अधिकाऱयांनीही दबाबाखाली चौकशी केली. ग्रामस्थांना सहकार्य करण्याऐवजी त्यांनाच धारेवर धरले त्यामुळे प्रकरण आणखीन चिघळलेले आहे. या पाखाडी प्रकरणामध्ये दोषी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांचे त्वरीत निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. असे न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे.