वृत्तसंस्था/ चेन्नई
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याचा सहकारी व मित्र सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावरून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याने सांगितले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक नोंदवणारा रैना हा पहिला भारतीय फलंदाज आहे.
सुरेश रैना हा धोनी कर्णधार असताना त्याचा अत्यंत विश्वासू खेळाडू म्हणून ओळखला जात होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये वनडे विश्वचषक जिंकला होता, रैना या संघातील एक सदस्य होता. या स्पर्धेच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने महत्त्वाची खेळी केल्या होत्या. ‘माही, तुझ्यासमवेत खेळणे हा निव्वळ आनंददायक अनुभव होता. म्हणून मी देखील तुझ्या या प्रवासात सोबत असणार आहे. या नव्या प्रवासात मी तुझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासियांचे आभार. जय हिंद!’ अशा भावना रैनाने सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
33 वर्षीय रैनाने 2005 मध्ये लंकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. मैदानावरील एक विश्<वासू खेळाडू असलेल्या रैनाने 226 वनडे सामन्यात 5615 धावा 35.3 च्या सरासरीने जमविल्या. त्यात 36 अर्धशतके आणि 5 शतकांचा समावेश आहे. 2010 मध्ये त्याचे कसोटी पदार्पणही लंकेविरुद्धच झाले. त्याला 18 कसोटीत 31 डाव खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने 26.6 च्या सरासरीने 768 धावा जमविल्या. 120 ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. जुलै 2018 मध्ये त्याने भारताचे शेवटचे प्रतिनिधित्व केले होते. पण त्याला मागील वर्षी झालेल्या विश्वचषक संघात स्थान मिळविता आले नाही. त्याने भारतातर्फे 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही प्रतिनिधित्व केले होते. त्यात त्याने 29.18 च्या सरासरीने 1605 धावा जमविल्या. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक नोंदवणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू होण्याचा मान त्याने मिळविला आहे.
सचिनकडून कौतुक
रैनाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीतील कामगिरीचे कौतुक केले. ‘भारतातर्फे खेळताना शानदार योगदान दिल्याबद्दल अभिनंदन. कसोटी पदार्पणावेळी झालेली भागीदारी आणि आपल्यातील संवादाची अजूनही आठवण येते. भविष्यातील दुसऱया इनिंगसाठी तुला मनापासून शुभेच्छा,’ अशा शब्दांत सचिनने रैनाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.