ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर सज्जादसह अन्य एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. अद्याप सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
आज सकाळी सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील स्पेशल पोलीस ऑफिसर (SPO) शहीद झाले होते.
बारामुल्लातील क्रेझरी भागात हा हल्ला झाला. त्यानंतर हल्ला झालेल्या परिसरात नाकाबंदी करून सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू होते. दरम्यान, सर्च ऑपरेशनवेळी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर सज्जादसह अन्य एकाचा खात्मा करण्यात यश आल्याचे काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले.